जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानाला कायापालट लवकरच पाहायला मिळणार आहे. आमदार राजूमामा भोळे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जुन्याच उद्यानाला नवीन लूक देत पुनर्बाधणीच्या कामाला सुरुवात झाली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने उद्यानाचे भूमिपूजन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते झाले. भाऊंचे उद्यान व गांधी उद्यानाच्या धर्तीवर सर्व सुविधांनी सुसज्ज असे बहिणाबाई उद्यानाचा वर्षभरात जळगावकरांना आनंद घेता येणार आहे.

मनपाच्या मालकीच्या बहिणाबाई उद्यानाची सध्या अत्यंत दैना झाली आहे. आधीच मोजकेच तीन उद्यान त्यातही एकाची दुरवस्था झाल्याने उद्यानाचा कायापालट करण्याची मागणी होत होती. अखेर आमदार राजूमामा भोळे यांच्या पुढाकाराने बहिणाबाई उद्यानाचा कायापालट करण्यासाठी शासनाकडून ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी पर्यटन विभागामार्फत खर्च केला जात आहे. आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

बहिणाबाई उद्यानाच्या कामासाठी कार्यादेश देण्यात आले आहे. वर्षभरात काम पूर्ण करायचे असल्याने डिसेंबर २०२६ पर्यंत उद्यान नवीन रूपात येणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व सुविधा असलेले उद्यान उपलब्ध झाल्यास भाऊंचे उद्यान व गांधी उद्यानात होणारी गर्दी विभागली जाईल.

कारंजासाठी प्रसिद्ध असलेले बहिणाबाई उद्यानातील कारंजा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत; परंतु नव्याने सुशोभिकरणाचे हाती घेतलेल्या कामात लहानांपासून मोठ्यापर्यंत उपयोगी व आनंद देणाऱ्या घटकांचा समावेश केला जाणार आहे. यात चिल्ड्रन प्ले एरिया, ग्रीन जिम एरिया, गाझीबो, दत्त मंदिर, लॉन फाउंटन, कलाकारांसाठी अॅम्पी थिएटर, प्रकाशव्यवस्था, ऑटोमॅटिक इरिगेशन सिस्टिम, युनिक ट्री प्लांटेशन, वॉक वे, एंट्री गेट, लहान मुलांसाठी खेळणी आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.








