तूच येना रे काका…बच्चू कडूंच्या ‘त्या’ आवाहनाला मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

सप्टेंबर 20, 2025 10:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेबर २०२५ । जळगावमध्ये बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले. त्यावेळी या दोघांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका केली.

gulabrao p bachhu kadu

बच्चू कडू यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला होता. तुमच्या जिल्ह्यातील संकटमोचक फक्त पक्षासाठी आहेत, ते जनतेसाठी नाहीत. हे सगळे गुलाम आहेत. एकेकाळी जोरात आवाज करणाऱ्यांचा आता आवाज निघत नाही, असा टोलाही त्यांनी मंत्री महाजन आणि पाटील यांना हाणला. दरम्यान यावेळी आता दुसरा मोर्चा थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरावर येत्या २८ तारखेला काढायचा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.

या पार्श्वभूमीवर माझ्या गावात येऊन तर दाखवा, असे थेट आव्हान आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही बच्चू कडू यांना दिले आहे. धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

माजी खासदार उन्मेश पाटील पाच वर्षे खासदार असताना कुठे गेले होते, तेव्हा त्यांना शेतकरी दिसले नाही का, याकडे त्यांनी लक्ष वेधले. काही लोक फक्त चमको आहेत. त्यांना माहिती होते की, २८ तारखेला जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत केळी पीक विम्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे त्यांनी तीच तारीख मोर्चासाठी निवडली. मोर्चे वगैरे काढणे तुमचा धंदा नाही, तो आमचा धंदा आहे. आम्ही शिंगाडे मोर्चा काढायचो तेव्हा असे १०-२० लोक येत नसत. माझ्या घरावर मोर्चा काढण्याच्या गोष्टी करतात. तूच येना रे काका… पाळधी गावात येऊन तर दाखव, अशा एकेरी भाषेत त्यांनी बच्चू कडू यांना लक्ष्य केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now