महाराष्ट्रातील दोन शहरांच्या नामांतराला केंद्र सरकारने दिली मंजुरी..
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२३ । महाराष्ट्र्रातील दोन शहरांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने नुकतीच औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराला परवानगी दिली. त्यानुसार औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.
औरंगाबाद” या शहराचे नाव बदलून ते “छत्रपती संभाजीनगर” असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, ” औरंगाबाद “, तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदलून ते “ छत्रपती संभाजीनगर “, तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.
उस्मानाबाद” या शहराचे नाव बदलून ते “धाराशिव” असे करण्याच्या भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक 7 फेब्रुवारी, 2023 अन्वये दिलेल्या महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे, “उस्मानाबाद”, तालुका व जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र राज्य नाव बदलून ते ” धाराशिव ” तालुका व जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने अंतिम मंजुरीसाठी त्याबाबतचे पत्र 20 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्र सरकारकडे पाठविले होते. त्याला आता केंद्राने मंजुरी दिली आहे.
मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘ छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आज केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता तसेच यासंदर्भात विधिमंडळात देखील ठराव संमत झाला होता.