मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बैठकीला शिवसेना खासदारांची उपस्थिती, खासदारांचा संसदेत नवा गट स्थापणार ?
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । संसदेच्या अधिवेशनात शिवसेनेच्या खासदारांत फूट निर्माण करण्यात येईल, अशी शक्यता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी वर्तवली होती. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीला १४ खासदार उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाची एक महत्त्वाची बैठक ट्रायडन्टमध्ये पार पडली. त्यात १४ शिवसेना खासदार या बैठकीत सहभागी झाल्याची माहिती मिळते आहे. श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह आणखी १२ आमदार कोणते, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, हे १४ खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटून नवा गट स्थापन करणार आहेत. या गटाचे संसदेतील गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
शिवसेनेतील दोन तृतियांश आमदार सोबत घेऊन बंडखोरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदार फोडण्यात येणार असल्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी संसदेच्या अधिवेशनात शिवसेनेच्या खासदारांत फूट निर्माण करण्यात येईल, अशी शक्यता यांनीही वर्तवली होती. अखेर आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन मिटिंगमध्ये शिवसेनेचे 14 खासदार उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच आणखी दोन खासदारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहेत.
एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाल्यानंतर राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिकांत शिवसेनेत फूट पडून अनेक माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने शक्तिप्रदर्शनही करीत आहेत. शिवसेना हा आपलाच पक्ष आहे आणि त्यांचे चिन्हही आपलेच आहे, असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून करण्यात येतो आहे. आता शिवसेना खासदारांतही मोठी फूट पडल्यास उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख पदी कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. दीपक केसरकर यांची मुख्य परवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 14 खासदार या बैठकीला होते का याबाबत मात्र काहीही थेट बोलणे केसरकर यांनी टाळले. सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या संसदेच्या अधिवेशन काळात शिवसेनेचे खासदार काही भूमिका घेणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मंत्रिमंडळ वाटपाबाबतही या दौऱ्यात एकनाथ शिंदे हे भाजपा पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच २० तारखेला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीबाबतही दिल्ली दौऱ्यात काही विधिज्ञांची चर्चा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.