जळगाव जिल्हाजळगाव शहर

भारनियमनाची कोंडी फोडण्याचे महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । उन्हाचा सुरूअसलेला प्रकोप व कोळसा टंचाईमुळे विजेच्या वाढत्या मागणीएवढी वीज उपलब्ध होत नसल्याने तात्पुरते व आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. तथापि भारनियमनाची ही कोंडी फोडण्यासाठी महावितरणकडून वेगाने सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. तसेच खुल्या बाजारातून वीज खरेदी करून गुरुवारी (दि. १४) मध्यरात्रीपासून राज्यातील कृषी वीजवाहिन्यांना ८ तास वीजपुरवठा देण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सोबतच इतर ग्राहकांसाठी सुरूअसलेले भारनियमन कमीत कमी राहील याची काळजी घेण्यात येत आहे. 

दरम्यान, मागणीप्रमाणे वीजपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे राज्यात शुक्रवारी (दि. १५) सकाळपर्यंत कोणत्याही ठिकाणी भारनियमन करण्यात आले नाही. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमधील निर्णयानुसार टाटा कंपनीच्या कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून (सीजीपीएल) महावितरणने वीजखरेदीची प्रक्रिया पूर्ण केली असून गेल्या तीन दिवसांपासून अतिरिक्त स्वरुपात ६३६ मेगावॅट वीज उपलब्ध झाल्यामुळे भारनियमनातून मोठा दिलासा मिळत आहे. यासोबतच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडून (एनटीपीसी) येत्या १५ जूनपर्यंत दररोज ६७३ मेगावॅट वीजपुरवठा सुरू राहणार आहे. 

महावितरणवर सर्व ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून महावितरण वीज खरेदी करीत आहे. परंतु कोळसा टंचाई व इतर तांत्रिक कारणांमुळे या वीजनिर्मिती कंपन्यांकडून पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. महानिर्मितीकडून १५०० मेगावॅट वीज कमी मिळत आहे व मिळालेल्या माहितीनुसार महानिर्मितीच्या प्रकल्पांमध्ये केवळ चार दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे. यासोबतच एनटीपीसीच्या सोलापूर व सीपत येथील वीजनिर्मिती प्रकल्पामधून जवळपास १२०० मेगावॅट वीज कमी मिळत आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून उष्णतेच्या तडाख्याची लाट ४० ते ४३ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिरावली आहे. त्यामुळे राज्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेच्या मागणी तब्बल ३००० ते ३५०० मेगावॅटने तर मुंबई वगळता महावितरणच्या उर्वरित कार्यक्षेत्रात ही मागणी सुमारे २००० ते २५०० मेगावॅटने वाढली आहे. महावितरणची सद्यस्थितीत २४५००-२५००० मेगावॅट अशी अभूतपूर्व मागणी आहे. परंतु वीज खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून कोळसा टंचाई व गॅसची कमतरता व इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने सुमारे २३०० ते २५०० मेगावॅट तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून अन्य स्रोतांकडून वीज खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. त्याची फलश्रृती म्हणून सीजीपीएल व एनटीपीसीकडून सद्यस्थितीत १३०९ मेगावॅट वीज अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध होत आहे. 

विजेचे भारनियमन टाळण्याचे आटोकाट प्रयत्न म्हणून महावितरणकडून खुल्या बाजारामधून (पॉवर एक्सचेंज) २००० मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी करण्यात येत आहे. त्यातून कृषिपंपांना गुरुवारी (दि. १४) मध्यरात्रीनंतर ८ तास वीजपुरवठा करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या देशभरातून वीज खरेदीला मोठी मागणी असल्याने खुल्या बाजारातील वीजदर प्रतियुनिट १२ रुपयांवर गेले आहे. या दराने वीज खरेदीची तयारी असून देखील सध्या पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. कोयनेतील वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू असून आणखी १० टीएमसी पाणीसाठा वापरण्यास विशेष मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भारनियमनाच्या संकटाची व्याप्ती कमी आहे. मात्र कोयनेतील पाणी वापराची जूनपर्यंतची मर्यादा लक्षात घेता वीजनिर्मितीवर मर्यादा आलेली आहे. अशा अभूतपूर्व वीज संकटाच्या स्थितीत शर्थीचे प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांना ८ तास वीजपुरवठा करण्यासोबतच इतर ग्राहकांसाठी विजेचे भारनियमन टाळण्याचे किंवा कमीत कमी करण्याचे महावितरणचे नियोजन सुरू आहे. 

Related Articles

Back to top button