⁠ 
रविवार, मे 19, 2024

फैजपूरला चोरट्यांचा डंका, गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन लुटण्याचा प्रयत्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । यावल तालुक्यातील अडावद येथील एटीएम मशीन लुटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार ताजा असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फैजपूर येथे गॅस कटरच्या सहाय्याने येथील एटीएम मशीन तोडून यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न फसला असून घटना उघड होताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फैजपूर येथील दूध शीतकरण केंद्राच्या समोर स्टेट बँकेचे एटीएम आहे. आज पहाटे या एटीएममधून धूर निघत असल्याचे काही नागरिकांना दिसल्याने त्यांनी लागलीच स्टेट बँकेतील कर्मचार्‍यांना फोनद्वारे याबाबतची माहिती दिली. कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून पोलीस स्थानक आणि अग्नमीशामन दलास पाचारण केले.

पोलिसांनी केलेल्या पाहणीत स्टेट बँकेच्या एटीएमला गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरट्यांना मशिन कापता न आल्याने ते अर्धवट सोडून त्यांनी पळ काढल्याचे दिसून आले. ही घटना पहाटे झाल्याची माहिती समोर आली आहे. आज चौथा शनिवार आणि उद्या रविवार असल्याने बँकेतर्फे काल सायंकाळी एटीएममध्ये रोख रक्कम टाकण्यात आली होती. सुदैवाने चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने मोठी रक्कम सुरक्षित राहिली आहे.

फैजपूर स्थानकाचे एपीआय सिध्देश्‍वर आखेगावकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या संदर्भात चौकशी सुरू केली असून अग्निशमन दलाने धगधगत असलेली आग काबूत आणली. एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहराच्या ठिकाणी जळगावातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ, अडावद येथे आणि आज झालेल्या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.