जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चोरीच्या प्रयत्नात असलेला चोर तरुणांच्या सतर्कतेने साहित्य सोडून चोर पसार झाल्याची घटना दि. १२ रोजी घडली. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल होता, अखेर स्थानिक गुन्हे शाखेने सदर गुन्ह्यातील संशयिताला जेरबंद केले आहे. जुबेर इकबाल तडवी (वय 22, रा. कासली ता. जामनेर, ) असे अटक आरोपीचे नाव आहे. पुढील तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्यातील संशयीत हा जामनेर तालुक्यातील कासली येथील रहीवाशी असल्याचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजले होते. संशयीत जुबेर ईकबाल तडवी हा पहुर येथील आठवडे बाजारात गेला असल्याचे समजल्यानंतर पो.नि. बकाले यांनी आपल्या पथकातील सहका-यांना पहुर येथे रवाना केले. पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशीअंती व त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अटक केली. जामनेर पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या भादवि 457, 380, 511 या गुन्ह्याची देखील त्याने कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोहेकाँ लक्ष्मण अरुण पाटील, पोना किशोर ममराज राठोड, पोना रणजीत अशोक जाधव, पो.कॉ. विनोद सुभाष पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.