जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । बांधकाम मजुराने चार अल्पवयीन मुलींवर अश्लील वर्तन केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे घडली होती. या गुन्ह्यात खटला चालून न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. एका महिला संशयिताची निर्दोष मुक्तता केली आहे. रशिद उर्प पापा सलाम शेख (वय ४५, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील रशिदची आत्या शबनुरबी हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याबाबत असे की, पाळधी गावातील एका शेतकरी दांपत्याने घराचे बांधकाम सुरू केले होते. त्यासाठी वरच्या मजल्यावर विटा चढवण्यासाठी रशीद याला काम देण्यात आले. रशीदने २९ मार्च २०१४ रोजी शेतकरी दांपत्याच्या मुलीस पिण्यासाठी पाणी मागत घरात प्रवेश केला. यानंतर त्याने घराचा दरवाजा बंद करून घेतला. शेतकऱ्याच्या मुलीसह तिच्या मैत्रिणी अशा १० ते १२ वयोगटातील तीन मुली या वेळी घरात होत्या. रशीदने या तीनही मुलींसोबत अश्लील वर्तन केला. याचवेळी आणखी एक मुलीने दार ठोठावले. रशीदने तिला घरात घेऊन तिच्यावरही अत्याचार केला. या वेळी एका मुलीच्या आजीने बाहेरून दरवाजा ठोठावला असता आतून प्रतिसाद मिळाला नाही.
या आजीने खडसावून आवाज दिल्यानंतर रशीदने दरवाजा उघडला. यानंतर चारही मुली घराबाहेर पळून गेल्या. तर रशीदही बाहेर निघाला. यावेळी रशीदची आत्या शबनूरबी मुलींकडे पाहून हसत होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी दोन पीडित मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यामुळे ही घटना उघडकीस आली. पालकांनी रशीद याला जाब विचारला असता त्याच्यासह शबनूरबी यांनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र येथे दोघांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे दोषारोप न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायाधीश एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने एकूण ९ साक्षीदार तपासले. यात चारही पीडित मुलींचा समावेश होता. पीडित मुलींनी घडलेला प्रकार न्यायालयात कथन केला. सुनावणीअंती न्यायालयाने रशीद याला दोषी धरून आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलींना देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहेत. तर शबनूरबी हिला निर्दाेष मुक्त केले. सरकार पक्षातर्फे अॅड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी सहकार्य केले.