मुक्ताई पालखीचे १८ जूनला प्रस्थान, पंढरपूरला कधी पोहोचेल अन् कसा असेल मार्ग..

जून 10, 2024 2:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२४ । पंढरपूरची आषाढी वारी म्हटलं की हातात टाळ घेऊन हरिनामाच्या जल्लोषात मग्न झालेले वारकरी पटकन डोळ्यासमोर येतात. आषाढी वारी निमित्त राज्यभरातल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात. दरम्यान, राज्यभर मानाचे स्थान असलेल्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईंचा पादुका पालखी सोहळा कधी प्रस्थान करेल याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच वारकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

muktai palkhi jpg webp

यंदा मुक्ताईंच्या पादुका पालखी सोहळ्याचे ३९५ वे वर्षे असून तो १८ जून रोजी दुपारी १ वाजता कोथळी येथील संत समाधिस्थळापासून पंढरपूरच्या दिशेने निघेल. २७ दिवसांचा पायी प्रवास करून हा सोहळा १४ जुलैला पंढरपुरात दाखल होईल.

संत मुक्ताईंच्या पादुका पालखी सोहळ्यात दरवर्षी हजारोंच्या संख्येने वारकरी व अनेक दिंड्या सहभागी होतात. मुक्ताईसंत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा जळगाव, बुलडाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर या सहा जिल्ह्यांमधून प्रवास करतो, ६०० किमी एवढा सर्वात लांब प्रवास करून आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणारा हा एकमेव पालखी सोहळा आहे.

गतवर्षी ही संख्या पंधरा दिंड्या व पंधराशे वारकरी अशी होती. यंदा दोन हजारांवर वारकरी सहभागी होऊ शकतात. सोहळ्याच्या २७ दिवसांच्या प्रवासात वारकऱ्यांची भोजन, चहा-नाष्ट्याची सोय हे दुपारचे थांबे असलेली गावे व रात्री मुक्कामाची गावे करतात. आषाढी वारीत सहभागाचे आवाहन मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराजांनी केले आहे.

येथे होईल मुक्काम
मुक्ताईनगर येथील नवीन मंदिरात पहिला मुक्काम होईल. यानंतर अनुक्रमे मलकापूर, मोताळा, बुलडाणा, येळगाव, चिखली, भरोसा फाटा, देऊळगाव माही, देऊळगाव राजा, जालना, काजळा फाटा, अंबड, वडीगोत्री, गेवराई, पाडळशिंगी, बीड माळीवेस, बीड बालाजी मंदिर, बानगाव फाटा, पारगाव, वाकवड, भूम, जवळा, शेंद्री, माढा, आष्टीचा मुक्काम. नंतर पंढरपूर.

पंढरपूरमधील नियोजन
सोहळा पंढरपूर येथे पोहोचल्यावर संत नामदेव महाराज आजे गुरू संत मुक्ताई पालखी सोहळा भेट, संत मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान, पंढरपूर प्रवेश होतो. नंतर १६ जुलैला संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांच्या पालखी सोहळा भेटी वाखरी येथे होतील. यानंतर पंढरपुरात मुक्काम करून २१ जुलैला संत मुक्ताई पालखी पंढरपूर येथून परतीच्या मार्गाला निघेल. १० ऑगस्टला सोहळा मुक्ताईनगर येथे पोहोचेल. या दिवशी नवीन मंदिर ते कोथळी मंदिरापर्यंत दिंडी स्पर्धा होईल

परतीच्या प्रवासात मुक्कामाची गावे …
परतीच्या प्रवासात पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम रोपडे येथे होईल, यानंतर अनुक्रमे उपळाई, वाकडी फाटा, वांगी, सरम्कुंडी फाटा, रौळसगाव, बीड शाहूनगर, रांजणी, खामगाव, डावरगाव, काजळा फाटा, कुंभेफळ, आळंद फाटा, मेरा खुर्द, बेराळा, केळवद, वाघजाळ फाटा, घुसर, धरणगाव, मुक्ताईनगरातील नवीन मंदिर आणि तेथून कोथळीतील मूळ मंदिर असा प्रवास होईल

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now