जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । राष्ट्रीय स्थरावर डेअरी च्या वृद्धीसाठी काम करणाऱ्या इंडियन डेअरी असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली. यात अंमळनेरचे अरुण पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य लढाईत योगदान दिलेले नारायणराव सुकलाल पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. अरुण पाटील यांनी देशातील नामवंत संस्था आय. आय.टी. खरगपूर येथून पदव्युत्तर शिक्षण कृषी अभियांत्रिकी मधून पुर्ण केले आहे. डेअरी क्षेत्रात त्यांचे 45 वर्ष एवढे मोठे योगदान असून 10 वर्ष त्यांनी NDDB येथे ही सेवा दिली आहे. 1948 साली स्थापन झालेली ‘इंडियन डेअरी असोसिएशन’ ही डेअरी उद्योगातील उच्च संघटना आहे. भारतभर चार विभागीय कार्यालय सुद्धा असून दूध उत्पादक, व्यावसायिक,नियोजक, शास्त्रज्ञ, अध्यापक संस्था आणि विविध मंडळ या सर्वांना एकत्रपणे गुंफून डेअरी च्या विकासासाठी कार्य करणारी इंडियन डेअरी असोसिएशन ही एक नावाजलेली संघटना आहे. डॉ. कुरियन, डॉ. खुरोडे, डॉ.सेन, डॉ. भट्टाचार्य या डेअरी च्या दिग्गजांनी या संघटनेचे अध्यक्षपद भूषवले.
या संघटनेची निवडणूक नुकतीच पार पडली. अमूलचे डॉ. सोधी यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. अरुण पाटील हे उपाध्यक्ष म्हणून व राजेश लेले हे सद्स्य म्हणून सार्वजनिक गटातून तर चेतन अरुण नरके हे दूध उत्पादक गटातून सदस्य म्हणून निवडुन आले आहेत. दिल्ली येथे महाराष्ट्रातुन तीन जणांच्या निवडीने सर्वस्थरातून डेअरी क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.