⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून होणार थंडीचे आगमन?

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । सध्या राज्यासह जळगाव जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरु आहे. पुढील दोन तीन दिवसात जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे. त्यानंतर दिवाळीपूर्वीच म्हणजे १९ ऑक्टाेबरपासून जिल्ह्यात तापमानात घट हाेऊन थंडीचे आगमन हाेण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्याच्या शेवटची जिल्ह्यात उघडीप दिल्यानंतर उन्हाचा चटका वाढला होता. त्यावेळी उन्हाचा पारा ३५ पर्यंत गेला होता. त्यामुळे उकाडा जाणवत होता. मात्र दसऱ्यापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उन्हाचा पारा कमी झाले. परंतु परतीच्या पावसाने काढणीला आलेलं सोयाबीन आणि वेचणीच्या तोंडावर असलेल्या कापूस पिकांचं मोठं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी शेतात सोंगणी करुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात सापडलं आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

दरम्यान, येत्या शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जाेर ओसरणार आहे. त्यानंतर दिवाळीपूर्वीच म्हणजे १९ ऑक्टाेबरपासून जिल्ह्यात तापमानात घट हाेऊन थंडीचे आगमन हाेण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात दाेन दिवस धुके पडण्याचा अंदाज आहे.