गावठी पिस्तूलासह दहशत माजविणार अटकेत
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । जामनेर- बोदवड रस्त्यावरील एका हॉटेलसमोर गावठी पिस्तूल सह दहशत माजविणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर-बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेल समोर सार्वजनिक रस्त्यावर संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत हा तरुण हातात गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवीत होता. या बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक रवाना केले. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० हजार रुपये किंमतीची गावठी पिस्तुल हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत किशोर राठोड यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सूनगत (वय-२०) रा. सिव्हील हॉस्पिटल क्वार्टर, वरणगाव याच्याविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे.