जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने डोणदिगर व अन्य अशा १७ गावांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आमदार मंगेश चव्हाण यांनी डोणदिगरसह परिसरातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. याला यश मिळाले असून आता या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे.
या पाणी पुरवठा योजनेत रोहिणी, डोणदिगर, घोडेगाव, खडकी बु., हिरापूर, तांबोळे, तळेगाव, कृष्णनगर, हातगाव, ब्राम्हणशेवगा, नाईकनगर, पिंपळगाव, पिंप्री बु., करजगाव, शिरसगाव, अंधारी, बिलाखेड या गावांचा समावेश आहे. या पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल ७५ कोटी रूपयांचा निधी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी समाजमाध्यमातून जाहीर केली आहे. यामुळे या सर्व १७ गावांमधील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय होणार असून याचा येथील नागरिकांना लाभ होणार आहे