जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२१ । सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करावी याबाबत संभ्रमावस्था आहे. ते ज्या पिकांची पेरणी करतात त्यातून उत्पादन होणाऱ्या बियाण्यास बाजारामध्ये योग्य भाव मिळेलच असेही नाही. परंतु महाबीजचे विविध पिकांच्या गुणवत्तापूर्ण पायाभुत बियाण्यापासून उत्पन्नात वाढ होते.
सदरील बिजोत्पादनातून उत्पादीत कच्चे बियाणे महामंडळाकडे जमा केल्याबरोबर 80 टक्के बाजारभावाएवढे पैसे बिजोत्पादकास त्वरीत मिळतात व त्यानंतर प्रक्रिया झालेल्या बियाण्यास बाजारभावापेक्षा 20 टक्के जास्त भाव मिळतो. तसेच बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना बिज प्रक्रियेसाठी वाजवी दरात जैविक खते व बुरशीनाशके उपलब्ध करुन देण्यात येतात. त्यामुळे सुध्दा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होते.
बिजोत्पादन कार्यक्रमाची आगावू नोंदणी दि. 20 मे, 2021 पर्यंत जिल्हा कार्यालय, महाबीज, जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक येथे करावी. या बिजोत्पादनामध्ये ज्युट, सु. ज्वारी, तूर, मुंग, उडीद, धान, सोयाबीन इत्यादी पिकांचे बिजोत्पादन घेतले जाते. शेतकरी बंधुनी जिल्हा कार्यालयास त्वरीत संपर्क साधावा व सदरील बिजोत्पादन कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन महाबीजचे विभागीय व्यवस्थापक श्री. साईप्रकाश नवोड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.