जळगावातील शेतकरी बांधवांना कृषि विभागाचे आवाहन, पेरणीबाबत काय म्हणाले पहा..
जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जून २०२३ । शेतकरी बांधव मान्सून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र मान्सून अद्यापही केरळात दाखल झाला नसून त्याची वाट आणखी काही दिवस पाहावी लागणार आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ठराविक कापूस वाणाचा आग्रह न धरता आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार बाजारात उपलब्ध असलेल्या कापूस वाणाची निवड करावी. सर्व कापूस वाण हे उत्तम दर्जाचे असल्याने पेरणीची घाई न करता ७५ ते १०० मि.मि. पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस पिकाचे अंदाजे पेरणी क्षेत्र ५.५० लाख हेक्टर असून कापूस हे पीक जिल्ह्यात मुख्य नगदी पीक आहे. कापुस बियाणे लागवडीसाठी २७.५० लाख पाकिटांची आवश्यकता असून लागवडीसाठी आवश्यक कापूस बियाणे जिल्हयात उपलब्ध झालेले आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरीया, डिएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचा साठा असल्यामुळे यावर्षी खतांचा तुटवडा होणार नाही. तसेच कापूस बियाणे, खते जादा दराने व बिना बिलाने खरेदी करु नये.
जिल्ह्यातज कुणीही, कुठेही कृषि निविष्ठाची जादा दराने विक्री करत असल्याचे दिसून आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९०५४ व मोबाईल क्र. ८९८३८३९४६८ वर माहिती द्यावी. असेही श्री. ठाकूर यांनी कळविले आहे.