जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२५ । भुसावळ आणि जळगावमार्गे मोजक्याच गाड्या पुण्यासाठी धावत असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता मध्य रेल्वेने जळगाव-भुसावळमार्गे पुण्यासाठी आणखी एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल

खरंतर जळगाव जिल्ह्यातील हजारो प्रवासी नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी दररोज पुण्याकडे ये-जा करतात. विशेषतः दिवाळीच्या काळात एसटी, खासगी निमआराम बसेस आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. जळगावहुन पुण्यासाठी फ्लाय ९१ या विमान कंपनी विमानसेवा सुरु आहे. मात्र विमान प्रमाण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

भुसावळ–पुणे दरम्यान धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस प्रवाशांसाठी मोठा आधार ठरली होती. पण ही गाडीही कोरोना लॉकडाऊननंतर भुसावळऐवजी अमरावतीहून धावत असल्याने जळगाव, भुसावळच्या प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. याशिवाय, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या जळगावमार्गे पुण्याकडे धावत असल्या तरी त्यांना विशेषतः जळगावात थांबा नसतो. नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लाभ देखील मर्यादित आसन क्षमतेमुळे निवडक प्रवाशांनाच होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता मध्य रेल्वेने जळगाव-भुसावळमार्गे पुण्यासाठी आणखी एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे. ०१४०३ साप्ताहिक विशेष गाडी सात ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल. तर चाळीसगावला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३ मिनिटाने, जळगावला सकाळी ५ वाजून २८ मिनिटाने व भुसावळला सकाळी ५ वाजून ५५ मिनिटाने पोहोचेल. यानंतर अमरावती येथे त्याच दिवशी सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होतील.
याशिवाय, ०१४०४ साप्ताहिक विशेष गाडी आठ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी अमरावती येथून १२.०० वाजता सुटेल तर भुसावळला दुपारी ३ वाजून ४० मिनिटाने, जळगावला दुपारी ४ वाजून ८ मिनिटाने तसेच चाळीसगाव स्थानकावर सायंकाळी ५ वाजून १३ मिनिटाने पोहोचले. नंतर पुणे येथे दुसऱ्या दिवशी ००.१५ वाजता पोहोचेल. तर ही ट्रेन या गाडीच्या सुद्धा आठ फेऱ्या होतील. चाळीसगावसह जळगाव आणि भुसावळ या स्थानकांवर दोन्ही बाजुने अमरावती-पुणे विशेष गाडीला थांबा देण्यात आला आहे. चार वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय, दोन सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह ही गाडी धावेल.







