⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

शेतकऱ्यांनो..! मान्सूनबद्दलचा दुसरा दीर्घकालीन अंदाज आला, महाराष्ट्रात कसा राहणार मान्सून?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने नैर्ऋत्य मान्सूनबद्दलचा दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून त्यात जून ते सप्टेंबर या दरम्यान, संपूर्ण भारतात सरासरी 96 टक्के पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख 1 जून ही असते. यंदा तो उशिरा म्हणजे 4 जूनला केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा मान्सून हंगामात एल निनो परिणाम घडण्याची शक्यता आहे; मात्र एल निनो आणि मान्सून यांचा थेट संबंध नसल्याचं भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात कसा राहणार मान्सून?

मराठवाडा, विदर्भ जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची शक्यता आहे. दीर्घ काळासाठी म्हणजे जून-सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अंदाजात महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  हवामान विभागाकडून (IMD) तिसरा अंदाज हा जुलै महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. 

हवामान विभागाच्या मान्सूनविषयक दोन दीर्घकालीन अंदाजांपैकी पहिला अंदाज अचूकतेच्या बाबतीत थोडा कमी असल्याचा इतिहास आहे. मान्सून सरासरीपेक्षा कमी झाला, तर साहजिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. कारण भारताची अर्थव्यवस्था अद्याप मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे.