जळगाव लाईव्ह न्यूज । बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून नोकरी लाटल्याप्रकरणी राज्यभरात कारवाईचा सपाटा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी दिव्यांगत्व तपासणी अहवालात आवश्यक त्या निकषांनुसार टक्केवारी आढळून न आल्याने जळगाव जिल्हा परिषदेतील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यानंतर आता आणखी एका कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तर अजून एका कर्मचाऱ्याच्या निलंबन प्रस्तावावर आज मंगळवार दि, १३ रोजी निर्णय होणार आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग बोदवडचे वरिष्ठ सहाय्यक शंकर वसंतराव वाघमारे असं निलंबन केलेल्या तिसऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यापूर्वी पाचोरा पंचायत समितीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लेखा विक्रम सुरेश पाटील तसेच धरणगाव पंचायत समितीत कार्यरत कनिष्ठ सहाय्यक लेखा संतोष लक्ष्मण पाटील यांनी बोगस दिव्यांग प्रकरणात शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेऊन सीईओंनी त्यांचे निलंबन केले

आतापर्यंत शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याकडे ६८३ कर्मचाऱ्यांना पुर्नतपासणीसाठी पाठवण्यात आले असून आता पर्यंत ४३ कर्मचाऱ्यांचे अहवाल जीएमसी अधिष्ठाता यांनी जि. पकडे दिले आहे. त्यातील ४ कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वात तफावत आढळून आल्याने त्यापैकी ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असुन एकाची कारवाई प्रस्तावित आहे. ६८३ पैकी बऱ्याच कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या आहे. त्यानुसार अहवाल आल्यानंतर कारवाई होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे.





