अनिल चौधरी विधानसभेच्या निकालाविरुद्ध न्यायालयात जाणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२४ । नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच अनपेक्षित आकडे समोर आले आहे. सर्वत्र ईव्हीएमचा घोळ असल्याचे म्हटले जात आहे. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात देखील तसेच काही असून निकालाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी सांगितले आहे. माझ्यासह आणखी कुणी न्यायालयात दावा दाखल करण्यास तयार असल्यास त्यांचे स्वागत असल्याचे अनिल चौधरी यांनी म्हटले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले असून महायुतीचे अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले तर महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्ती आणि इतर पक्षाचे व अपक्ष उमेदवार पराभूत झाले आहेत. निकालानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएमवर टीका सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने जरी निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष पद्धतीने पार पाडली असेल तरी मशीनमध्ये कुणी, कसा घोळ केला हे त्यांच्या देखील लक्षात आले नसावे.
क्रमांक १ च्या उमेदवाराची २ मते महायुतीच्या उमेदवाराला
आमच्या अंदाजानुसार रावेर-यावल मतदारसंघात प्रथम क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेली मते म्हणजेच अनिल चौधरी यांची मते ७५५१० अशी गृहीत धरल्यास त्यातील ५०४३० मते महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात गेली. त्यामुळे आम्हाला २५ हजार १७० मते शिल्लक राहिली. भाजप उमेदवाराला ११३६७६ अशी मते मिळाली मात्र प्रत्यक्षात ती ६३२४६ अशीच आहेत. तर काँग्रेस उमेदवाराला ७० हजार ११४ मते मिळाली. प्रत्येक मतदारसंघात अशीच परिस्थिती आहे, असे अनिल चौधरी यांनी म्हटले आहे.
न्युमेरिकल आकडेवारीचे गणित, हक्काची मते गायब
महायुतीच्या अनेक उमेदवारांच्या पारड्यात पडलेल्या मतांची आकडेवारी लक्षात घेतली असता बहुतांश आकडे गणितीदृष्ट्या जुळणारी आहे. त्यात बहुतांश आकड्यांची बेरीज २१ ते ३० दरम्यान आली आहे. अनेक ठिकाणी, अनेक गावात हक्काची वाटणारी मते देखील उमेदवारांना मिळालेली नाही. मनसे उमेदवाराचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात त्याला घरचीच मते देखील मिळाली नसल्याचे दिसून येते. धुळे ग्रामीणला रोहिदास पाटील यांचा मुलगा कुणाल पाटील हे मोठे प्रस्थ असून त्यांच्या अनेक संस्था आहेत. अवधान हे गाव धुळ्याजवळ असून तिथे त्यांना ० मते दाखवली आहेत. जेव्हा की गावात त्यांच्या संस्थेत कार्यरत अनेक कर्मचारी आहेत. एकंदरीत सर्वच ठिकाणी घोळ दिसून येतो, असेही अनिल चौधरी यांनी सांगितले.