⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

रील बघून संतप्त प्रतिक्रिया; प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत १००० रुपये करा अशी मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज। ३१ जुलै २०२३। सोशल मीडिया सध्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. यावर अनेक विनोदी व्हिडिओ, डान्सचे व्हिडिओ, लग्न, सीसीटीव्ही फुटेज, अपघात, चोरी, गुन्हे, प्राणी पक्ष्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर अनेकदा सोशल मीडियावरील व्हिडिओ समाजासाठी घातक ठरू शकतात. त्यावर नेटकरीसुद्धा आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरूण मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर भन्नाट डान्स करत असून या तरूणाचा डान्स पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. त्याच्या या रीलवर मुंबईकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “अशा डान्सरवर बंदी घातली पाहिजे” असंही काही नेटकरी म्हणाले आहेत.

हा व्हिडिओ ट्वीटरवरील Roads of Mumbai या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. “भारतीय रेल्वेला आम्ही मागणी करतो की प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत एक हजार रूपये करावी” असं कॅप्शन या व्हिडिओवर लिहिलं आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शेअर केला आहे.

“का? पावसात मोर नाचतोय तर नाचू द्या ना, हा व्यक्ती पाच रूपयांत मिळणारं लोकल ट्रेनचं तिकीट खरेदी करून रील बनवू शकतो, आमच्या रक्तामध्येच जुगाड आहे, इथे प्लॅटफॉर्म तिकीटसुद्धा काढलं जात नाही” अशा भन्नाट कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.