⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

जेवणात उडीद डाळ-भाकरी केल्याचा राग, मुलाने केला बापाचा खून

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । मुलानेच संतापाच्या भरात बापाला केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी रावेर तालुक्यातील पाल येथे घडली आहे. जेवणात उडदाची डाळ व भाकरी केल्याचा राग आल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यात खाटेच्या माचल्याचा दांडका डोक्यात मारत खून केला आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

रावेर तालुक्यातील पाल येथे गट शेत शिवार गट नंबर २७१ शेतात अनाज्या भारत्या बारेला (वय ७५) हे कुटुंबासह राहत होते. सोमवारी सायंकाळी त्यांनी मुलगा दिनेश उर्फ शिवा बारेला (वय २६) यास जेवण करून घेण्यास सांगितले. यावेळी दिनेशने काय केले आहे असे विचारले असता त्याच्या वडीलांनी उडीद दाळ व भाकरी केल्याचे सांगितले. जेवणात उडीद दाळ व भाकरी केल्‍याचा राग येऊन दिनेशने वडील व बहीणीस चापटा बुक्यांनी मारहाण केली.

वयस्कर वडील दिनेशच्या मारहाणीपासून तेथून पळून जात असतांना दिनेश याने लाकडी खाटेच्या माचल्याच्या दांडक्याने वडील अनाज्या बारेला यांच्या तोंडावर व डोक्यावर तडाखा मारून गंभीर दुखापत केली. मारहाणीतच अनाज्या बारेला यांचा मारहाणीत मृत्यू झाला. बनाबाई नरसिंग बारेला यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सचिन नवले व पोलीस करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी श्री.लवांडे, सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक, पोलीस निरिक्षक मनोहर जाधव व पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच संशयीत दिनेश उर्फ शिवा यास पोलीसांनी अटक केली आहे.