त्याच दिवशी लटकेंचा विजय निश्चित झाला होता ; गुलाबराव पाटलांचा दावा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय सोप्पा झाला. पण, त्यांच्या विजयावरून श्रेयवादाची लढाई भाजप आणि शिंदे गटात सुरू झाली आहे. ‘ज्या दिवशी भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली होती, त्याच दिवशी लटकेंचा विजय निश्चित झाला होता’ असा दावा शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.

गुलाबराव पाटलांची सुषमा अंधारेंवर टीका
गुलाबराव पाटील यांनी भर सभेत सुषमा अंधारे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख नटी म्हणून केला होता. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

सुषमा अंधारेंचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर
गुलाबराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या त्यांचा माज संविधानिक पद्धतीने उतरवणार, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. ‘गुलाबराव पाटील ज्या पातळीवर उतरले त्यावर मी उतरू शकत नाही. तुम्ही अश्लाघ्य आणि सवंग टिप्पणी करून माझ्या बाईपणावर हल्ला करण्याचा आणि मला नामोहरम करण्याचा जो बालीश प्रयत्न करत आहात, त्यावरून मला तुमची कीव करावीशी वाटते, तुमची भाषा तुमचा माज दाखवणारी आहे. परंतू मी बाईपणाचं कोणतंही व्हिक्टीम कार्ड खेळणार नाही. तुमचा सरंजामी माज संविधानिक पद्धतीने उतरवून दाखवेन,’ असा इशारादेखील सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांना (gulabrao patil) दिला.