⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

विमानतळाचे काम देण्याचा बहाणा, चाळीसगावच्या कंत्राटदाराला २१ लाखांचा गंडा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे बांधकामाचे ३५ कोटींचे कंत्राट मिळवून देतो असे, सांगत कमिशनच्या नावाखाली चाळीसगाव येथील बांधकाम व्यावसायिकाला २१ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पुण्यातील टेराफर्मा सुपरस्ट्रॅक्ट प्रा. लि. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह त्याचा एजंट अशा दोघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल चाळीसगाव येथील ठेकेदार प्रविण जयसिंग ठोके हे जळगाव येथील नितिन काबरे यांचे भागीदार आहेत. त्यांना पुण्यातील टेराफर्मा सुपरस्ट्रॅक्ट कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक प्रतीत शहा व त्याचा एजंट दीपक कुमार मंडल (प.बंगाल) यांनी, गोव्यातील विमानतळाच्या बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमीष दाखवले. हे कंत्राट टेराफर्मा कंपनीने ३५० कोटीत घेतले असून, त्या कंपनीला सब कॉन्ट्रॅक्टर कंपन्यांची गरज आहे, असे सांगत ठोके यांच्याकडून सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून २० लाख रूपये घेतले. तसेच एजंट दीपक मंडल याला अडीच लाख रूपये दिले. प्रत्यक्षात प्रतीत शहाच्या कंपनीला केवळ दीड कोटी रूपयाचे काम मिळाल्याचे समोर आले. ३५ कोटी रूपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो असे भासवून ठोेके यांच्याकडून २० लाख रूपय, तर एजंट दीपक मंडल याने कमिशनपोटी अडीच लाखांपैकी दीड लाख रक्कम परत करून उर्वरीत एक लाख रक्कम न देता फसवणूक केली. ही घटना ८ ते ११ मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी चाळीसगावचे कंत्राटदार प्रवीण ठोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.