सशस्त्र क्रांतीची सुवर्णांकित पाने भाग- ४
स्वधर्म आणि स्वराज्यासाठी १८५७मध्ये झालेल्या देशव्यापी स्वातंत्र्यसंग्रामानंतर स्वतंत्र भारतीय प्रजासत्तेची स्थापना करण्यासाठी वासुदेव बळवंत फडकेंद्वारे घडून आलेल्या सशस्त्र क्रांतीमुळे भारतीयांना इंग्रज प्रशासनाच्या विरोधात हत्यार उचलून संघर्ष करण्याची केवळ प्रेरणाच मिळाली नाही, तर सशस्त्र क्रांतीच्या प्रक्रिया-पद्धतींची स्पष्ट माहिती देखील प्राप्त झाली. सेनापती फडकेंनी महाराष्ट्राला केंद्र बनवून जो संघर्ष सुरू केला, त्याचे युद्ध-क्षेत्र आता पंजाब बनले होते आणि तिथे क्रांतीचे सेनापती होते; सतगुरू रामसिंह कूका.
या आध्यात्मिक योद्ध्याने कूका संप्रदायाची स्थापना केली आणि नंतर याच मार्गावरील अनुयायींना शस्त्रबद्ध सैनिकांच्या रूपाने तयार करून, ब्रिटीश साम्राज्यवादाची वीट; विटेनेच फोडण्याची योजना बनवली. ज्या भूमीवर दशमेश पिता श्री गुरूगोविंद सिंह यांनी मुस्लिम दहशतवाद्यांविरोधात लढा देण्याकरिता खालसा पंथाची स्थापना करून तलवार उचलली होती, त्याच भूमीवर सतगुरु श्री रामसिंह यांनी इंग्रजांच्या साम्राज्याला मुळापासून उपटून टाकण्यासाठी ‘नामधारी कूका सिंह’ यांना तयार करून, एका सशस्त्र सैनिकाच्या रूपाने उभे केले.
सतगुरु रामसिंह पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील एका भैणी नामक गावाचे उंच आणि सबळ नवतरुण होते. त्यांच्या युवावस्थेतच ते महाराजा रणजीत सिंहांच्या सेनेत भरती झाले होते. तरुण रामसिंहांना परमात्म्य-साधनेची अत्यंत मनापासून आवड होती; शिवाय त्यांचा परमात्म्यावर तितका विश्वासही होता. इंग्रजांद्वारे समस्त मोठ्या घराण्यांना साम्राज्याचा भाग बनविण्यात आल्यानंतर, तरुण रामसिंहांसाठी इंग्रजांच्या सैन्यात राहणे; कठीण होते. ते सरकारी नोकरी सोडून आपल्या गावी; भैणीत आले. त्यांचे संपूर्ण लक्ष ईश्वरभक्तीकडेच खेचल्या जाऊ लागले. चारही दिशांना त्यांच्या आध्यात्मिक तेजाचा प्रचार-प्रसार होऊ लागला. परमात्म्याची भक्ती आणि समाजाची सेवा या दोन प्रमुख कामांमध्ये संपन्नता प्राप्त करण्यासाठी तरुण रामसिंहांनी नामधारी संप्रदायाची स्थापना केली.
याच दिवसांमध्ये महाराष्ट्रातील संत रामदास स्वामी भारतीय तरुणांमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजवत पंजाबमध्ये येऊन पोहोचले. त्यांनी भैणी गावात येऊन सतगुरु रामसिंहांची भेट घेतली आणि म्हणाले, “देश पारतंत्र्यात आहे. ही वेळ भजन-कीर्तन करण्याची नाही. सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडून भारतीयांना स्वतंत्र बनविण्यासाठी साधना करा.” सतगुरु रामसिंह या संतोपदेशाने प्रभावित होऊन आपला मार्ग बदलण्यासाठी तयार झाले. आता त्यांच्या प्रवचनामध्येही स्वधर्म, स्वराज्य आणि स्वातंत्र्य यांसारख्या विचारांनी आपली जागा भक्कम केली होती.
सतगुरु रामसिंहांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. स्वातंत्र्य, स्वधर्म आणि स्वराज्य यांची ज्वाला; नामधारी समाज, विशेष करून तरुणांमध्ये प्रज्वलित होऊ लागली. आता या तरुणांद्वारे इंग्रज सरकारकडून असहयोगाची प्रतिज्ञा करून घेतल्या जाऊ लागली. पुढे चालून स्वातंत्र्याच्या युद्धातही इंग्रज सरकारकडून असहयोगाचा मार्ग निवडण्यात आला. या प्रतिज्ञेबरोबरच रामसिंहांच्या आदेशाचाही प्रभाव जाणवू लागला.
नामधारींनी इंग्रजांच्या सरकारी वस्तूंचा पूर्णपणे बहिष्कार केला. न्यायालयांमध्ये जाणे बंद केले; सोबतच सरकारी शाळांच्या विरोधात देखील अभियान गतिमान होत गेले. हळूहळू पंजाबच्या एका मोठ्या भागात नामधारी संप्रदायाचा प्रभाव एवढा वाढला, कि त्यांनी एका प्रकारे आंदोलनाची स्वतंत्र व्यवस्थाच बनवली. संपूर्ण पंजाबला २२ विभागांमध्ये वाटण्यात आले. सतगुरु रामसिंहांनी संप्रदायाच्या सर्व गतिवधींचे संचालन करण्यासाठी विभागीय अध्यक्षांचा नियुक्ती-विस्तार केला.
या गतिविधींमुळे पंजाबमधील ब्रिटीश प्रशासन गोंधळात सापडले. संप्रदायाच्या जास्तीत जास्त गतिविधींना कायदेशीररित्या थांबविण्यात आले. सतगुरु रामसिंहांच्या आदेशातून चालू असलेल्या गतिविधींना थांबवून भूमिगत कार्यक्रम सुरू करण्यात आले. या नव्या नीतीचे फलस्वरूप म्हणजे; आतल्या आत क्रांतीची आकांक्षा प्रबळ होत गेली. योजनेनुसार देशाच्या सेनेत विद्रोहाचा वणवा पेटविण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. संग्रामासाठी पद्धतशीरपणे वेळ, ठिकाण आणि योग्य निश्चय इत्यादी बाबी निश्चित करण्यात आल्या.
इकडे नामधारींच्या लपून काम करण्याच्या नव्या पद्धतीमुळे इंग्रज सरकारला वाटले, कि सतगुरू रामसिंहांचा नामधारी संप्रदाय संपुष्टात आला आहे. म्हणून इंग्रज सरकारने सर्व प्रकारचे प्रतिबंध हटवले. यामुळे देशातील सैनिकांच्या गतिविधींना आणखी गती मिळाली. सतगुरू रामसिंहांना साक्षात परमेश्वराचा अवतार मानून लोक त्यांच्या उपदेशाचे पालन करू लागले. देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्याकरिता पंजाबमधील तरुण कुठल्याही प्रकारे बलिदान देण्यासाठी तयार झाले.
याच दिवसांत घडलेली एक मार्मिक घटना आहे. काही नामधारी तरुण अमृतसरच्या दिशेने जात होते. त्यावेळी गोहत्या करणाऱ्या कसाई लोकांना त्यांनी पाहिले. नामधारी तरुणांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. सरकारी पोलीस या कूका सिंहांना शोधण्यात अयशस्वी ठरले. आता पोलिसांनी निरपराधी आणि नि:शस्त्र लोकांना पकडून त्रास देण्यास सुरूवात केली. सतगुरू रामसिंहांनी कासायांना मारणाऱ्या आपल्या शिष्यांना पोलीस ठाण्यात जाण्याचे आदेश दिले. नामधारी तरुणांनी गुरूंच्या आज्ञेचे पालन करीत आत्मसमर्पण केले.
याचप्रकारे भैणी साहिब येथे संपन्न होत असलेल्या माघीच्या (लोहडी) यात्रेत नामधारी कूका-तरुण शेकडोच्या संख्येत जात होते. एका कूका-तरुणाला एकटा जात असतांना पाहून काही कसाई यवनांनी त्याला अत्यंत वाईट पद्धतीने मारून अर्धमेल्या अवस्थेत सोडून दिले. त्याच्यासमोर एका गाईला कापून, तिचे रक्त त्या कूका-तरुणाच्या घशात ओतले. हे हिंदूविरोधी कुकृत्य करून ते यवन तिथून पळून गेले. रक्तरंजित अवस्थेत तो कूका-तरुण गुरूंच्या दरबारात भैणी साहिब येथे पोहोचला. त्याची अशी दयनीय अवस्था पाहून दरबारातील उपस्थित असलेल्या नामधारी भक्तांचे रक्त खवळू लागले. सर्वांनी एका स्वरात उद्घोष केला, कि ”इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांती करण्याची हीच वेळ आहे. क्रांतीची जी योजना इतक्या वर्षांपासून बनत आहे, तिला त्वरित अंमलात आणल्या जायला हवं.” तरुणांच्या उत्साहाचे कौतुक करत गुरू रामसिंहांनी त्यांना समजावले, की ”अगदी आतापासूनच हत्यारबद्ध क्रांतीची सुरूवात करणे; म्हणजे गडबड होईल. अपरिपक्व अवस्थेत केल्या जाणारे कुठलेही कार्य आपल्या संप्रदायासाठी आणि देशासाठी सुद्धा भयावह ठरू शकते.”
बहुतांश नामधारी शिष्यांनी गुरूंच्या आज्ञेचे पालन केले; मात्र काही अतिउत्साही तरुणांनी आतापासूनच काहीतरी करून मरण्याची घोषणी केली. १५० हून अधिक कूका-तरुणांनी गुरूचा आदेश डावलून यवनांवर थेट हल्ला करण्याच्या उद्देश्याने गुरू-दरबाराचा त्याग केला. त्यांनी मलोध नामक किल्यावर हल्ला करून यवन शिपायांना ठार केले. त्याच किल्ल्यात गुरू रामसिंहांचे काही शिष्य-सैनिक होते. त्यांनीही या आक्रमणकारी कूका-तरुणांना साथ दिली. मलोधच्या किल्ल्यावर विजय मिळवल्यानंतर या कूका सैनिकांनी मलेर कोटलाच्या सैनिक-छावणीवर हल्ला केला.
आक्रमणकारी कूकांनी छावणीच्या शस्त्रागार आणि मालमत्तेवर ताबा मिळवला. या प्रकारे हा रक्तरंजित संघर्ष तीन ते चार दिवसांपर्यंत चालत राहिला. पंजाबच्या इंग्रज सरकारने लुधियानाच्या डिप्टी कमिश्नर केविनला; सेनेच्या तुकडीसोबत या सशस्त्र विद्रोहाला थांबवण्यासाठी, शिवाय हल्ला करणाऱ्यांना पकडण्यासाठी पाठवले. परिणामस्वरूप; असंख्य कूका-तरुण मारले गेले आणि ६८ जणांना अटक करण्यात आली. पकडल्या गेल्यावर या स्वातंत्र्यसैनिकांनी ‘सतगुरु रामसिंह की जय’ या घोषणांनी इंग्रजांविरुद्ध वातावरण निर्माण केले.
सैनिकी न्यायालयाने निर्णय घेतला, की ‘या ६८ कूका-तरुणांना तोफेच्या गोळ्यांनी उडवल्या जावे.’ दुसऱ्याच दिवशी मलेर कोटलाच्या एका खुल्या मैदानात हे अमानवी आणि हिंस्रक कुकृत्य अलोट गर्दीसमोर घडवून आणल्या जाऊ लागले. पाच-पाच नामधारींना तोफेच्या तोंडाला बांधून तोफेचे बटण दाबल्या जायचे. चारही दिशांना तोफेतून निघणारा काळा धूर आणि कूका-तरुणांच्या शरीराचे तुकडे, मांस, हाडे आकाशात उडून जमीनीवर पडत होते. याप्रकारे काही वेळातच ६७ कूका-तरुणांना बिभत्स मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. अगदी शेवटपर्यंत हे तरुण मात्र आपल्या गुरूंच्या नावाचा उद्घोष करत राहिले.
अखेरीस उरलेल्या एका तेरा वर्षाच्या नामधारी मुलाला; लहान असल्यामुळे तोफेला बांधता येत नव्हते. ‘हा मुलगा सुद्धा आता अमानुषपणे मारल्या जाणार. याच्या सुद्धा नाजूक आणि कोमल शरीराच्या चिंधड्या आकाशात उडवल्या जाणार’, अशा भयावह दृश्यांची कल्पना करत असलेल्या, गर्दीमध्ये बसलेल्या केविनच्या पत्नीला त्या मुलाची दया आली आणि तिने आपल्या पतीजवळ त्या मुलाला सोडून देण्याची प्रार्थना केली.
अत्याचारी पोलीस अधिकारी केविन; आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकून त्या मुलाला म्हणाला, “जर तू त्या गुंड आणि बदमाश रामसिंहाची साथ सोडशील, तर आम्ही तुला जीवदान देऊ शकतो.” आपल्या गुरूंबद्दल बोलल्या गेलेले या प्रकारचे अपमानकारक आणि वाईट शब्द ऐकून त्या मुलाचे स्वत:वरील नियंत्रण सुटले. त्याने स्वत:ला पोलिसांच्या तावडीतून सोडवले आणि थेट जाऊन केविनच्या खांद्यावर चढला. त्या मुलाने राक्षसी प्रवृत्तीच्या केविनची लांबलचक दाढी घट्ट पकडली. त्याची पकड इतकी घट्ट होती, कि इंग्रज सैनिकांना अक्षरश: त्याचे हात कापावे लागले. कूकांचा तो लहानगा जीव जमीनीवर कोसळला. तलवारीचे कित्येक वार करून त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले.
इकडे २६ कूका-तरुणांना मलोधच्या सैनिकी छावणीमध्ये फाशी देण्यात आली. इंग्रज सरकार आणि पोलीसांना मात्र हे काही शेवटपर्यंत उलगडले नाही, कि एका व्यक्तीचे (गुरू) शिष्य एवढे बलिदान देण्यासाठी तत्पर कसे बनतात! वास्तविक पाहतां; सतगुरूंच्या आध्यात्मिक शक्ती, मानवीय उपदेश आणि त्यांच्या पारतंत्र्याविरोधात असलेल्या विचारांमुळे, उत्तर भारताच्या भूमीवर देशभक्तीची जी ज्वाला पेटली होती, तिचेच फलस्वरूप म्हणून नामधारी युवकांनी स्वातंत्र्यसैनिक बनण्याचा दृढ निश्चय केला.
अखेर सरकारी अधिकाऱ्यांनी नेमका आणि मुळावर घात करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाला कळून चुकले होते, कि ‘समग्र घटनाक्रमाच्या मागे रामसिंह कूकांचाच हात आहे. आणि कूकांना मुळासहीत संपवल्यावर संपूर्ण नामधारी वृक्ष आपोआपच कोसळेल.’ सरकारी अधिकाऱ्यांनी सतगुरूंना कुठल्याही गुन्ह्याखाली अटक करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली. जेव्हा कसलेही कारण मिळाले नाही, तेव्हा रेग्युलेशन ॲक्ट १८१८ अंतर्गत कूकांच्या गुरूंना अटक करण्यात आली. एवढेच नव्हे; तर त्यांना एका योजनाबद्ध प्रक्रियेअंतर्गत बर्माच्या कुप्रसिद्ध कारागृहात पाठवून एकांतवासात गुदमरून मरण्याकरिता बंदीस्त करण्यात आले.
आपली मातृभूमी आणि कर्मभूमी यांपासून कितीतरी दूर; पूर्णत: निर्वासित व असह्य अवस्थेत या सशस्त्र क्रांतीच्या सेनापतींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आयुष्यभर ज्या ध्येयासाठी जोडून राहिले, त्याला आपल्या डोळ्यांनी पूर्ण होतांना पाहण्यासाठी सतगुरु महाराज मुकले. बाकी शिष्यांना इंग्रज सरकारने अगदी निर्दयीपणे आणि अमानुष शिक्षा दिली. गोळ्या घालणे, कारागृहात डांबून ठेवणे तसेच देशातून हाकलून देणे यांसारख्या अतिकठीण शिक्षा-प्रयोगातून नामधारींना संपवून टाकण्याचे षड्यंत्र यशस्वीपणे रचण्यात आले. सरकारी दमनचक्र गतिमान झाल्यामुळे संप्रदायाची गतिविधी जवळपास संपुष्टात आली होती. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारी सशस्त्र योजना, काही कूका-तरुणांच्या अनुशासनहीनतेची शिकार बनून विस्कळीत झाली व मोडकळीला आली.
इथे पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. सर्वज्ञात आहे, कि १८५७मध्ये झालेल्या महासंग्रामात सुद्धा काही अतिउत्साही सैनिकांच्या अनुशासनहीनतेमुळे आणि उतावळेपणामुळे इंग्रज प्रशासन सावध झाले होते. परिणाम म्हणजे; असंख्य बलिदानानंतरही त्या महासंग्रामातील सेनापतींना पराजयाचा दंश झेलावा लागला. कूकांद्वारे पुनरुज्जीवित झालेला स्वातंत्र्यसंग्राम देखील काही मूठभर तरुणांच्या निश्चित काळाच्या आधीच युद्धाचे चौघडे वाजवण्यामुळे इंग्रजांनी या युद्धाला मातीमोल करण्याची युक्ती शोधली.
तरीही कूका-स्वातंत्र्यसैनिकांच्या असाधारण बलिदानामुळे, पंजाबसह समग्र उत्तर भारतात जी राष्ट्रभावना जागृती झाली, त्यामुळे भविष्यात होणाऱ्या संघर्षाची एक सशस्त्र भूमिका नक्कीच तयार झाली. कुठलेही क्रांतीयुद्ध अयशस्वी झाल्यानंतर काही वेळापुरते क्रांतिकारकांचे पाऊल थांबते; मात्र क्रांतीच्या उद्देश्यामागे काडीमात्र कमतरता राहत नाही. थोड्या वेळाकरिता राखेच्या खाली जळणारी ज्वालामुखी; पुन्हा नव्याने वर येते आणि नव्या क्रांतीचा श्रीगणेशा होतो.
ज्या प्रकारे १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची दबलेली ठिणगी वासुदेव बळवंत फडकेंच्या क्रांती-योजनेच्या स्वरूपातून ज्वाला बनत पेटून उठली आणि वासुदेवांच्या शेतकरी-कामगार आंदोलनानंतर क्रांतीची मशाल पुन्हा पंजाबच्या कूका-आंदोलनाद्वारे पेटून उठली, त्याचप्रकारे; या संग्रामाशिवाय देखील देशाच्या कितीतरी भागांमध्ये क्रांतिकारकांनी शस्त्र उचलून इंग्रज साम्राज्याच्या भिंतींना कंपित करून सोडले.
क्रमश:
– नरेंद्र सहगल
पूर्व संघप्रचारक, लेखक, पत्रकार.
मराठी अनुवाद – अविनाश काठवटे