सशस्त्र क्रांतीची सुवर्णांकित पाने भाग- १०
सशस्त्र क्रांतीच्या तरुण योद्ध्यांकडून जुलुमी ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या छातीवर सतत होणार्या प्रहारामुळे दुःखी किंवा घाबरून गेलेल्या इंग्रजांनी पुन्हा एकदा समानता आणि शिक्षा या एकतर्फी धोरणाखाली भारतीयांना काही राजकीय सुविधा देण्याचा कट रचला. किंबहुना, या आवाहनाच्या सुधारणात्मक लालसेतून; सरकारला ब्रिटीशविरोधी देशद्रोह्यांना आश्रय देऊन सशस्त्र क्रांती पूर्णपणे चिरडून टाकायची होती.
इतिहास साक्षी आहे की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतातील जनतेने गेल्या १२०० वर्षात तुर्क, मुघल, पठाण आणि इंग्रज यांच्या विरोधात प्राणपणाने लढा दिला आहे. ज्या भारतीयांनी एक दिवसही पराधीनता स्वीकारली नाही, त्यांनी आत्मत्याग करण्यातही कोणतीच कसर सोडली नाही. केवळ इंग्रजांच्या १५० वर्षांच्या कालखंडात झालेल्या देशव्यापी स्वातंत्र्यलढ्यात लाखो स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान दिले गेले. पण अमृतसरच्या जालियनवाला बागेत झालेल्या सामूहिक आत्मत्यागाने लाखो क्रांतिकारकांना जन्म दिला आणि ब्रिटिशांच्या शवपेटीचा पाया रचल्या गेला.
जालियनवाला बागेचे भीषण हत्याकांड; जिथे भारतात इंग्रजांनी केलेल्या क्रूर अत्याचाराचा जिवंत पुरावा आहे. त्याचबरोबर भारतीयांनी केलेल्या अगणित बलिदानाचे आणि स्वातंत्र्याच्या तळमळीचे हे एक अद्वितीय उदाहरण आहे. काही क्षणात शेकडो भारतीयांचा मृत्यू झाल्याचे दृश्य; म्हणजे तथाकथित सभ्यता आणि लोकशाहीचा आक्रोश करणाऱ्या इंग्रजांना कधीही धुवून काढता येणार नाही, असा कलंक आहे.
इंग्रजांना उलथून टाकण्याकरिता भारतभर पसरलेल्या क्रांतीला चिरडण्यासाठी, ब्रिटिश सरकारकडून अनेक काळे कायदे आणले जात होते. स्वातंत्र्यसैनिकांचा आवाज कायमचा बंद करण्याच्या उद्देशाने ब्रिटीश सरकारने राॅलेट कायदा लागू केला. या कायद्याची मदत घेऊन देशद्रोहाच्या संशयावरून कोणालाही अटक करून तुरुंगात टाकणे सोपे झाले. भारतातील वाढत्या राजकीय आणि क्रांतिकारी कार्यवाह्यांना दडपण्यासाठी राॅलेट कायद्यातील कथित देशद्रोह्यांना न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडण्याचा अधिकारही नव्हता. पोलिस आणि लष्कराला कोणतीही पूर्वसूचना न देता लाठीचार्ज आणि गोळीबार करण्याचे अधिकार देण्यात आले. हा रॉलेट कायदा ब्रिटिश सरकारने १९१९ मध्ये तेथील इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये ठरावाद्वारे मंजूर केला होता.
या कायद्याविरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात आला. मिरवणुका आणि निषेध सभांची झुंबड उडाली. अनेक नेते व स्वातंत्र्यसैनिक कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. अमृतसरचे दोन थोर सामाजिक नेते डॉ.सत्यपाल आणि डॉ.सैफुद्दीन किचलू यांना अटक झाली, तेव्हा अमृतसर आणि संपूर्ण पंजाबमध्ये इंग्रजांविरुद्ध रोष उसळला होता. त्या दिवसांत, १३ एप्रिल १९१९ रोजी वैशाखीच्या दिवशी, संपूर्ण पंजाबमधील शेतकरी वैशाखी स्नान करण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जमले होते. त्याच दिवशी जालियनवाला बागेत निषेध सभा आयोजित करण्यात आली होती; ज्यामध्ये सुमारे २० हजार लोक उपस्थित होते. रॉलेट कायदा नामक कीड मोडून काढण्यासाठी ही सभा होती. पंजाबचे ब्रिटीश गव्हर्नर जनरल मायकल ओडवायर यांच्या आदेशानुसार जनरल डायरच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश-भारतीय सैन्याने जालियनवाला बागेला वेढा घातला आणि कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार सुरू केला.
आधुनिक इतिहासकार प्रा. सतीशचंद्र मित्तल यांनी त्यांच्या ‘काँग्रेस, इंग्रजभक्ती ते राजसत्ता’ या पुस्तकाच्या पान ५६ वर ऐतिहासिक तथ्यांसह लिहिले आहे कि “१८५७ च्या महान घटनेनंतर, भारतीय इतिहासातील पहिले क्रूर आणि भीषण हत्याकांड १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे झाले. रॉलेट कायद्याच्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून, ब्रिटीश सरकारने ११ एप्रिल रोजी जनरल डायरला बोलावून त्याच्याद्वारे भारतीयांवर हा आघात केला आणि वैशाखीच्या सणावर जालियनवाला बाग येथे पंजाबमधील शेतकरी व सामान्य जनतेवर अक्षरश: १६५० गोळ्या झाडण्यात आल्या. सूर्यास्त होण्याआधी ६ मिनिटे सतत गोळ्या सुरूच होत्या. सर्व नियमांचे उल्लंघन करून, ज्या बाजूला गर्दी जास्त होती त्या बाजूने गोळ्या झाडण्यात आल्या. हत्येचा कट रचला होता. जनरल डायरच्या म्हणण्यानुसार; त्याला गोळीबार करतांना असे वाटत होते, कि तो फ्रान्सच्या विरोधात एका आघाडीवर उभा आहे. गोळ्या झाडण्यापूर्वी एक विमान त्या जागेला प्रदक्षिणा घालत होते.
या सभेला सुमारे २० हजार लोक उपस्थित होते. शेवटपर्यंत गोळ्या सुरूच होत्या. सुधारित अधिकृत आकडेवारीनुसार; ३७९ लोक मारले गेले आणि सुमारे १२०० लोक जखमी झाले. इम्पीरियल काउन्सिलमध्ये, महामहिम मदन मोहन मालवीय यांनी मृतांची संख्या १००० पेक्षा जास्त सांगितली तर स्वामी श्रद्धानंद यांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात १५०० ते २००० पर्यंत मृतांची संख्या सांगितली.
जालियनवाला बागेत एक विहीर होती; ती आजही आहे. या विहिरीत उडी मारून २५०हून अधिक लोकांनी जीव दिला. या हत्याकांडानंतर अमृतसरमध्ये रात्री आठ वाजता संचारबंदी लागू करण्यात आली. संपूर्ण पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला.
एवढ्या भीषण हत्याकांडानंतरही इंग्रज राज्यकर्त्यांच्या मनात कसलाही दया भाव उत्पन्न झाला नाही. अनेक निरपराध सत्याग्रहींना तुरुंगात टाकण्यात आले. अमृतसरमध्ये वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. मार्शल लॉद्वारे लोकांना लक्ष्य केले गेले. बाहेरून येणारी वर्तमानपत्रे बंद झाली. पत्रांच्या संपादकांवर खोटे खटले करून त्यांना प्रत्येकी एक-दोन वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली. अमृतसर, लाहोर इत्यादी ठिकाणी मार्शल लॉ च्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. ब्रिटीश सरकारने ८५२ जणांवर खोटे आरोप केले. त्यापैकी ५८१ जणांना दोषी घोषित करण्यात आले. दोषींपैकी १०८ जणांना फाशीची शिक्षा, २६५ जणांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर काही शिक्षा सुनाविण्यात आल्या. लोकांना बंदिस्त ठेवण्यासाठी लोखंडी पिंजरेही तयार करण्यात आले. संपूर्ण पंजाब अनेक महिने उर्वरित भारतापासून तुटलेला राहिला.
जालियनवाला बागेतील हत्याकांड; भारतातील चालू असलेल्या स्वातंत्र्यलढ्यात एक परिवर्तन घडवून आणणारी घटना ठरली. सशस्त्र क्रांतिकारक देशभर सक्रिय झाले. प्रत्युत्तर म्हणून; रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचा पुरस्कार परत केला. सरदार भगतसिंह यांनी जालियनवाला बागेतील रक्तरंजित माती घेतली आणि स्वातंत्र्यलढ्यात उडी घेण्याची शपथ घेतली. या हत्याकांडाला गव्हर्नर ओडवायर सर्वस्वी जबाबदार होते. २१ वर्षांनी; १९४० मध्ये सरदार उधम सिंग इंग्लंडला गेले आणि ओडवारला गोळ्या झाडल्या.
सरदार उधम सिंग हे कोणत्याही मोठ्या क्रांतीकारी पक्षाशी संबंधित नसले, तरीही ते तरुणपणापासूनच देशभक्त सरदार भगतसिंह इत्यादी निवडक क्रांतिकारकांच्या संपर्कात होते. नि:शस्त्र भारतीयांची कत्तल करणाऱ्या जनरल डायरला यमलोकात नेण्याच्या उद्देशानेच उधमसिंह १९१९ मध्ये लंडनला गेले होते. या ब्रिटीश शहरात ते वीस वर्षे राहिले आणि जनरल डायरला मारण्याच्या अधिकाराची वाट पाहू लागले. त्याच काळात ते वीर सावरकरांसारख्या क्रांतिकारकांशी जोडले गेले.
१३ मार्च १९४० रोजी तो क्षण आला ज्याची उधम सिंह वाट पाहत होते. लंडनमधील कॅस्टन हॉलमध्ये एक कार्यक्रम सुरू होता. त्याच सभेत सर मायकल ओडवायर बोलत स्टेजवरून खाली उतरताच, तिथे उपस्थित उधम सिंह यांनी लगेचच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्याचवेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लॉर्ड ॲटलँड, लॉर्ड रॅमिंग्टन आणि लॉर्ड लुईस यांचीही हत्या केली. त्यांच्या रिव्हॉल्व्हरच्या गोळ्या संपल्या होत्या; नाहीतर सभागृहात एकही इंग्रज अधिकारी उपस्थित राहिला नसता.
उधम सिंग यांच्या या धाडसी कृतीची वीर सावरकर आणि डॉ. मुंजे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी प्रशंसा केली, परंतु महात्मा गांधी इत्यादी काँग्रेस नेत्यांनी या कृत्याचा निषेध केला. ३१ जुलै १९४० रोजी लंडनमध्येच उधम सिंह यांना फाशी देण्यात आली. गळ्यात फास घालण्याआधी हा शूर स्वातंत्र्यसैनिक म्हणाला होता, “मला मृत्यूची कसलीही भिती वाटत नाही. मी माझ्या देशवासियांना भुकेने तडफडतांना पाहिले आहे, जालियनवाला बागेत नि:शस्त्र देशभक्त भारतीयांसोबत घडलेले ते भीषण दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे; जिथे त्यांना अंदाधुंद गोळीबार करून मारले जात होते. त्याच साम्राज्यवादी हुकूमशाहीला धडा शिकवण्यासाठी मी जनरल डायर आणि त्याच्या काही साथीदारांची हत्या केली. भारत माता की जय! क्रांती अमर रहे! ब्रिटिशांची हुकूमशाही नष्ट झालीच पाहिजे!”
क्रमश:
नरेंद्र सहगल
पूर्व संघप्रचारक, लेखक, पत्रकार.
मराठी अनुवाद – अविनाश काठवटे