जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर शहरात गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या सारबेटे येथील दोघांना पोलिसांनी हेडावे येथे सापळा रचून पकडण्यात आले. आरोपींकडून सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक विकास देवरे याना गोपनीय माहिती मिळाली होती की, तालुक्यातील सारबेटे येथून दुचाकीवर दोन जण अमळनेर शहरात गांजा विकण्यासाठी आणत आहेत. त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, मिलिंद सोनार, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, विनोद संदानशीव, संतोष नागरे, सागर साळुंखे याना घेऊन हेडावे गावाजवळ सापळा रचला.
सायंकाळी दोन जण दुचाकी (क्रमांक एम एच १९, डीयु ९५४३) वर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्या दोघांच्या मध्ये पांढऱ्या रंगाची प्लास्टिक गोणी आढळून आली. पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली असता त्यात गांजा सापडला. पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता अकील इब्राहिम मेवाती व मोहसीनखान शरीफखान मेवाती दोन्ही रा. सारबेटे असे सांगितले.
पोलिसांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष गांजाचे मोजमाप केले असता ६८ हजार रुपये किमतीचा ३ किलो ४३२ ग्राम गांजा, ६० हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व १० हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मिलिंद सोनार यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.