⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

स्वच्छता पंधरवाड्यासोबतच नियमित स्वच्छतेवर भर दिला जाणार- डॉ.उल्हास पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२३ । निरोगी आरोग्य व निरोगी मनासाठी सभोवतालचे वातावरण स्वच्छ असणे गरजेचे असते. त्यातच महाविद्यालय व हॉस्पिटल म्हटले तर रुग्णांना स्वच्छ वातावरण देणे हे रुग्णालय प्रशासनाचे नैतिक कर्तव्य असून या रुग्णालयाने ते जपले आहे. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्‍त आजपासून स्वच्छता पखवाडा येथे प्रारंभ केला असून यापुढेही नियमित परिसर स्वच्छतेवर येथे भर दिला जाणार असल्याचा विश्वास माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी व्यक्‍त केला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्‍त नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या आदेशानुसार डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यायल व रुग्णालयात आज रविवार दिनांक १ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजेपासून “स्वच्छता पखवाडा” यास प्रारंभ झाला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, नर्सिग सुपरिटेडेंंट संकेत पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ.दिनानाथ रॉय, प्रशासकीय अधिकारी एन जी चौधरी यांच्यासह स्वच्छता कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थीत होता.

पुढे बोलतांना संस्थाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करुन बाराही महिने परिसरात स्वच्छता करणार्‍या कर्मचारी वर्गाचा यावेळी सन्मानही त्यांनी केला. तसेच गोदावरी फाऊंडेशनच्या विविध संस्थांमध्येही आजपासून स्वच्छता अभियान सुरु झाले असल्याचेही ते म्हणाले. यानंतर वैेद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन एस आर्विकर यांनी स्वच्छता पंधरवाड्याचे महत्व सांगितले. २४ तास बाराही महिने स्वच्छ व नेटका असतो आणि तो यापुढेही राहील. बाराही महिने काम करीत असतांना त्याचा एक विशेष दिवस साजरा करावा या उद्देशाने आजपासून पंधरा दिवस स्वच्छता पंधरवाडा साजरा केला जाणार असल्याचेही डॉ.आर्विकर यांनी सांगितले.

यानंतर संपूर्ण महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरासह गेटसमोरील रस्त्याचीही संस्थेच्या अध्यक्षांसह संपूर्ण उपस्थीतांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. यावेळी बापू नेमाडे, उमेश नामदेव तसेच डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ यांची उपस्थीती होती.