जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । जळगाव शहराला संपूर्णपणे विविध समस्यांनी ग्रासले आहे. साध्या रस्त्यांपासून ते गटारीपर्यंत जळगाव शहरातील नागरिकांना महानगरपालिका काहीही पुरवू शकत नाही. अशातच जे नागरिकांकडे आहे ते तरी राहू द्या अशी नागरिकांची इच्छा असताना शिवाजीनगर मधील नगरसेवकांनी स्मशानभूमीत नागरिकांच्या सेवेसाठी ठेवण्यात आलेले बाकडे स्वतःच्या घरी नेऊन लावले असल्याची चर्चा शिवाजीनगर परिसरामध्ये सुरू झाली आहे.
जळगाव शहराचा ‘रियालिटी चेक’ हा जळगावकरांसाठी असलेला ‘जळगाव लाईव्ह’चा एक अभूतपूर्व उपक्रम. या उपक्रमांमधून जळगाव शहरातल्या नागरिकांच्या समस्या महानगरपालिकेपर्यंत, नगरसेवकांपर्यंत आणि एकंदरीत प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘जळगाव लाईव्ह’ करत असते. जळगावकर देखील या ‘जळगाव लाईव्ह’च्या विशेष उपक्रमला चांगलाच प्रतिसाद देत आहेत. यात नागरिकांशी विशेष संवाद साधला जातो. त्यांच्या समस्या नागरिक ‘जळगाव लाईव्ह’ पर्यंत पोहोचवतात आणि त्या समस्या ‘जळगाव लाईव्ह’ प्रशासनापर्यंत पोहोचवते.
शिवाजीनगर येथे प्रभाग २ मध्ये ‘रियालिटी चेक’ करण्यासाठी गेलेल्या ‘जळगाव लाईव्ह’च्या प्रतिनिधींना एक धक्कादायक माहिती मिळाली. नगरसेवकांनी चक्क शिवाजीनगर स्मशानभूमीतुन बाकडेच आपल्या घरी नेऊन लावले आहेत. खरं म्हणजे ही हास्यस्पद बाब आहेच पण त्याहून ही संतापजनक व धक्कादायक बाब आहे. कारण जे नगरसेवक शिवाजीनगरच्या रहिवास्यांना साधे रस्ते देऊ शकत नाहीत, साध्या गटारी देऊ शकत नाहीत असे नगरसेवक त्यांच्या हक्काचे बाकडे देखील सोडत नसतील तर हसू आणि संताप दोन्हीही येणारच. याबाबतचे दोन्ही फोटो आपण बातमीत दाखवले आहेत.
शिवाजीनगरमध्ये एकूण आठ नगरसेवक आणि दोन प्रभाग आहेत. नगरसेविका प्रिया जोहरे, रुकसाना अली खान, सरिता नेरकर आणि नगरसेवक दिलीप पोकळे हे प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक आहेत. तर प्रभाग क्रमांक दोनचे कांचन सोनवणे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर आणि नवनाथ दारकुंडे हे नगरसेवक आहेत. आता यातले नक्की कोणते नगरसेवक कोणत्या गटात किंवा कोणत्या पक्षात आहे? हे सांगणे अतिशय कठीण. कारण गेल्या वर्षभरात कित्येक नगरसेवकांनी तीनदा वेगवेगळे पक्ष व गट बदलले आहेत. मात्र या नगरसेवकांपैकी कुणीतरी स्मशानभूमीतले बाकडेच स्वतःच्या सोयीसाठी स्वतःच्या घराबाहेर नेऊन ठेवले आहेत. किंवा स्मशानभूमीतून बाकड्यांची चोरी केली आहे. असा आरोप रियालिटी चेकच्या दरम्यान प्रभाग २ च्या काही नागरिकांनी केला. मात्र ते नगरसेवक नक्की कोण आहेत याची माहिती त्यांनी दिली नाही.
पहा Reality Check : प्रभाग क्रमांक २ :