जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । महिन्याचा तिसरा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. देशभरात अक्षय तृतीया वेगवेगळ्या नावाने साजरी होत असली तरी खान्देशात आपण आखाजी म्हणून ओळखतो. खान्देशात आखाजीच्या सणाला सासुरवाशीण मुली माहेरी येत असल्या तरी आणखी एक वेगळेपण असते ते म्हणजे घरोघरी आणि गावागावात पत्त्यांचे मोठे फड रंगत असतात. विशेषतः ग्रामीण भागात चक्क मंडप टाकून पत्ते खेळले जातात. आखाजीचा जुगार म्हणजे केवळ मनोरंजनासाठी खेळाला जाणारा डाव असतो. अलीकडच्या काळात काही दिवसांसाठी जुगाराला व्यावसायिक रूप देण्यात येते. आखाजी आणि पत्त्यांचे फड असे काहीसे समीकरणच जुळले आहे.
अक्षय तृतीया म्हणजे खान्देशवासियांची आखाजी. खान्देशात आखाजीला सासुरवाशीन मुली आपल्या पतीसह माहेरी येतात. आखाजीला घरोघर घागर, डेरगं पूजन करून पितरांना वंदन केले जाते. घरी गोडधोड जेवणाचा बेत आणि विशेषतः आंब्याचा रस आणि पुरी केली जाते. माहेरी आलेल्या मुली, जावई, माहेरची मंडळी आखाजीच्या चार दिवसात चांगलीच धमाल करतात. उन्हाळ्याचे दिवस, बाहेर वाहणारा परतीचा वारा आणि सर्व नातेवाईक जवळ असल्याने घरच्या घरी मनोरंजनाचे खेळ खेळले जातात. शेतात, अंगणात बांधलेल्या झोक्यावर माहेरवाशीण मुली झोका खेळतात.
घरी असलेल्या मंडळी काहीसे मनोरंजन आणि मजा करण्यासाठी घरातल्या घरात पत्ते खेळतात. अगोदरच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत असल्याने आखाजीला मोठा गोतावळा जमायचा. कुटुंबातील मंडळी जास्त असल्यास घराबाहेर किंवा शेतात पत्त्यांचा डाव रचला जातो. पत्ते खेळणे म्हणजे जुगारप्रमाणे पैसे उधळणे नव्हे तर आपल्यातील जराशी मौज, मस्ती, चोरून लपून पत्ते पाहणे, थोडेफार पैसे हरणे, जिंकणे, पार्टी करणे असे या डावाचे स्वरूप असते. नेहमी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यात व्यावसायिक जुगार खेळला जातो परंतु आखाजीसाठी काही ठिकाणी खास मंडप उभारले जातात.
कुटुंबातील मंडळी प्रत्येक जण काही ना काही रक्कम घेऊन पत्ते खेळण्यासाठी जमतो. दुपारपासून सुरु झालेला डाव बऱ्याचदा पहाटेपर्यंत सुरु असतो. सकाळच्या भरपेट जेवणानंतर सायंकाळी हलके फुलके किंवा सकाळचाच बेत घेऊन रात्री पुन्हा पत्त्यांची मैफल भरते. ग्रामीण भागात या पत्ते क्लबची मोठी धूम असते. पत्त्यांच्या डावाच्या माध्यमातून एक कौटुंबिक संवाद देखील जोपासला जातो. पोलीस देखील आखाजीच्या काळात रंगणाऱ्या पत्त्यांच्या फडकडे दुर्लक्ष करीत असतात. दरवर्षी आणि विशेषतः आखाजीच्या आठवडाभर सुरु असणारे हे जुगार अड्डे आखाजी संपताच बंद देखील होतात. कुटुंबात हजारोंची तर बाहेर लाखोंची उलाढाल या माध्यमातून होत असते.