⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

अहिराणी भाषेला आहे हजारो वर्षांचा इतिहास! खान्देशी असाल तर नक्की वाचा

जळगाव लाईव्ह न्यूज | १८ मार्च २०२३ | डॉ.युवराज परदेशी | खान्देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेली अहिराणी भाषा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी खर्‍या अर्थाने समृध्द केली. आता अहिराणी गाण्यांमुळे अहिराणी भाषेचा गोडवा राज्यांच्या सीमा ओलांडून देशभर पसरला आहे. खान्देशात बोलल्या जाणार्‍या अहिराणी भाषेला हजारो वर्षांचा इतीहास आहे. आज केवळ खान्देशसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अहिराणी भाषा बोलली जात असली तर याचा बिहार, ओडिसा, उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब, सौराष्ट्र या राज्यांशीही संबंध असल्याचे इतीहासाची पाने उलगडतांना लक्षात येते. आज आपण अहिराणी भाषेचा गौरवशाली इतीहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खान्देशात अहिराणी ही बोली बोलली जात असल्यामुळे या भागाला ‘अहिराण पट्टी’ असेही म्हटले जाते. ‘हिस्ट्री ऑफ खान्देश’ या रिसर्च जर्नलमध्ये संशोधक प्रा.डॉ.सुधाकर सीताराम चौधरी यांनी प्रकाशित केलेल्या ‘अहिराणी बोलीचा इतिहास’ या शोधनिबंधात म्हटले आहे की, ‘अहिराणी’ म्हणजे ‘आभीर वाणी’. प्राचिन आभीर लोकसमूहाची भाषा म्हणजे अहिराणी. आभीर म्हणजे अहिर आणि अहिर म्हणजे गवळी होय. खान्देशात पूर्वी गवळी राजाची वा कानडांची सत्ता होती असे म्हटले जाते. अहिराणी बोली म्हणजे अभीर लोकांची बोली होय. अभीरांची बोली अभिराणी. अभीरचा अपभ्रंश अहिर आणि या अभिराणीचा अपभ्रंश अहिराणी असा आहे. भारतीय संस्कृती कोशामध्ये अहिर ही एक जात आहे. हे अहिर लोक बिहार, ओडीसा, उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब, सौराष्ट्र व खान्देशच्या परिसरात पसरलेले आहेत. अहिर हा अभीर या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे.

जळगाव जिल्ह्याला काळिमा फासणाऱ्या दंगलींचा असा आहे ‘काळा इतिहास’

अहिराणी ही अभिर वा अहिर लोकांची बोली म्हणून ओळखली जाते. खान्देशवर अभिर लोकांचे राज्य होते. अभिर लोकसमूदाय हा बाहेरुन आलेला लोकसमूदाय आहे व या लोकांनी खान्देशावर आपली सत्ता प्रस्थापित केल्यामुळे साहजिकच त्यांची बोली ही इतर बोलीपेक्षा लवकर प्रतिष्ठित पावली. अहिर लोकांकडे सत्ता असल्यामुळे त्यांनी खान्देशातील काळ्या कसदार जमिनीवर शेती करायला सुरवात केली. इतर जातीतील लोकांनी अहिरांच्या संपर्कामध्ये राहून त्यांची बोली, भाषा, संस्कृती, रुढी इ. अनेक गोष्टींचे अनुकरण केले. या अनुकरणामुळे या लोकांच्या मुळ बोलीवर अहिराणीचा मोठा प्रभाव पडला.

रामायण, महाभारतासारख्या ग्रंथामध्येही या आभीर लोकांचा उल्लेख आढळतो. आभीर लोक प्राचिन काळापासून खान्देशात वास्तव्य करीत असल्याचे पुरावे शिलालेख व प्राचिन ग्रंथामध्ये सापडतात. अहिराणी बोली बोलणारे अभिर लोक हे स्थलांतर करुन खान्देशमध्ये स्थिरावलेले आहेत. हे लोक पंजाबमार्गे स्थायिक झालेले आहेत. या स्थलांतरामुळे त्या – त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषेचा, बोलींचा परिणाम, प्रभाव व भाषेचे मिश्रण या लोकांच्या बोलीत झालेले आढळते. या विषयी डॉ. श्रीधर व्यं. केतकर यांनी आपल्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ या ग्रंथाच्या खंड ७ व ८ मध्ये माहिती दिलेली आहे. अहिराणी या बोलीवर गुजराती भाषेबरोबरच मराठी, नेमाडी, व हिंदुस्थानी या भाषांचा मोठा प्रभाव झालेला दिसतो.

खान्देशात जळगांव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. पण अहिराणी बोलीसंदर्भात मात्र या तीन जिल्ह्यांबरोबर औरंगाबाद जिल्ह्यामधील सोयगांव, कन्नडचा भाग व नाशिक जिल्ह्यामधील मालेगांव, कळवण, सटाणा तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो. नाशिक जिल्ह्यामधील चांदोर डोंगराच्या उत्तरेकडील भागाला ‘अहिराणपट्टी‘ असे म्हटले जाते. सटाणा, कळवण, चांदवड, मनमाड, नांदगांव, मालेगांव या तालुक्यातील खान्देशला लागून असणार्‍या बहुसंख्य गावांमध्ये अहिराणी भाषा बोली बोलली जाते. औरंगाबाद जिल्ह्यामधील सोयगांव तसेच अजिंठ्याच्या डोंगरांना लागून असलेला कन्नड तालुक्यामधील बरेचसे लोक खान्देशी बोली बोलत असतात. सातपुड्याच्या पर्वत रांगेत येणारे पण मध्यप्रदेशात मोडणारे शहापुर, इच्छापुर, वलवाडी, बर्‍हाणपुर या भागातही मुख्यत्त्वे करुन खान्देशी बोली बोलली जाते.