⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

कृषिमंत्री जागेवर नाहीयेत मात्र शेतकरी राजाला सांभाळा : मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ जून २०२२ | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे 40 सहकारी आमदारांसह आसाम मधल्या गोहाटी येथे तळ ठोकून बसले आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारमधील काही महत्त्वाचे मंत्री देखील आहेत. कृषी मंत्री दादा भुसे यांचा देखील या बंडखोर आमदारांमध्ये समावेश आहे. अशावेळी माझ्या शेतकरी राजाला आता तुम्हीच सांभाळा त्याला एकाकी पडू देऊ नका. त्याला जे हवे ते सरकार तिजोरी मधून बिनधास्तपणे द्या. असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांची विशेष बैठक आयोजत केले होते. या विशेष बैठकीमध्ये जिल्हाधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करण्यास सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण आहे अशा वेळी शेतकऱ्यांना काय हवं काय नको याकडे लक्ष देण्यासाठी दादा भुसे यांच्या आदेशाची वाट न बघता तात्काळ तुम्हीच निर्णय घ्या. याच बरोबर कुठेही पुराचे संकट आले. तरीही कोणाचेही फिकीर न करता तुम्हाला हवा तो योग्य निर्णय घ्या. मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींवर गेल्या चार दिवसापासून शांत आणि संयमी भूमिका ठेवून असलेले मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच संतापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला असून बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर त्यांनी जोरात तोंडसुख घेतले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज खुले आव्हानच केले असून ठाकरे थेट मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. बंडखोरांना ठाकरे यांनी इशारा दिला असून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना काय कमी केले असे ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री पद आणि सत्तेचा लोभ नसून मी राजीनामा देण्यास तयार असल्याचा पुनरुल्लेख त्यांनी केला आहे.मात्र त्या नंतर त्यांनी जिल्हाधिकार्‍यांची एक बैठक घेतली. यावेळी त्यांनी माझ्या शेतकरी राजाला आता तुम्हीच सांभाळा त्याला एकाकी पडू देऊ नका. त्याला जे हवे ते सरकार तिजोरी मधून बिनधास्तपणे द्या. असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले.