⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

बियाणे, खते, कीटकनाशकांबाबत कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्या या सुचना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 5 मे 2023 | खरिप हंगाम २०२३ मध्ये जळगाव जिल्ह्यात ७ लाख ५६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रफळावर पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आगामी खरीप हंगाम लक्षात घेता पेरणी वेळेत होण्यासाठी शेतकर्‍यांना कर्जपुरवठा वेळेत करावा. बी बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टिने सूक्ष्म नियोजन करावे, तसेच गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक २०२३ कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. कृषी मंत्री सत्तार म्हणाले की, खरीप पीक हंगामासाठी शेतकर्‍यांना कर्जपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यासोबतच जिल्हाधिकार्‍यांनी पीक कर्जासंदर्भात विविध बँकांसोबत बैठका घेऊन पीक कर्ज वाटपाचा आढावा घ्यावा. जिल्हानिहाय पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकर्‍यांना बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाने अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे.

कृषी विभागाने प्रत्येक गाव पातळीवर नियोजन करुन खते व बियाणे उपलब्धतेसंदर्भात ग्रामसभेच्या माध्यमातून माहिती देण्यासोबतच बियाण्यांची उगवण क्षमता तपासून त्याबाबत मार्गदर्शन करावे. शेतकर्‍यांची अडवणूक होऊ नये यासाठी खते, कीटकनाशके यांची भरारी पथकाद्वारे तपासणी करावी. बाहेरील राज्यातील बोगस बियाणे आपल्या जिल्ह्यात येणार नाही याबाबत दक्षता घेवून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचनाही, सत्तार यांनी यावेळी दिल्या.

नाशिक विभागाचे खरीप हंगाम नियोजन

आगामी खरीप हंगामासाठी २६ लाख ८७ हजार ३६ हेक्टरनुसार कृषी विभागाचे पेरणीचे उद्दीष्टे आहे. नाशिक जिल्ह्यात ६ लाख २७ हजार १४१ हेक्टरनुसार पेरणीचे नियोजन आहे. तसेच अहमदनगर ६ लाख ४९ हजार ७३०, जळगाव ७ लाख ५६ हजार ६००, धुळे ३ लाख ७९ हजार ६०० व नंदूरबार २ लाख ७३ हजार ९६५ हेक्टरनुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.