जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२२ । पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे शेतीच्या वादातून पोटच्या मुलाकडून आई-वडीलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात मुलासह सुन व नातवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे दशरथ राजाराम पाटील (वय-८५) हे आपल्या पत्नी साखरबाईसह वास्तव्याला आहे. ते शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा महादू दशरथ पाटील हा पत्नी व मुलांसह वेगळा राहतो. दरम्यान, शेती नावावर करून द्यावी यासाठी मुलगा महादू याने आईवडीलांकडे तगादा लावला होता. शेती नावावर करत नसल्याच्या रागातून महादू दशरथ पाटील याने १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता आईवडील त्यांच्या घरी ओट्यावर बसलेले असतांना महादूने वडीलांच्या डोक्यात काठी मारल्याने दुखापत केली. तर महादूची पत्नी संगिताबाई, मुलगा योगेश आणि गणपत यांनी साखरबाई यांना शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी दशरथ पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून मुलासह सून व नातवांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी महादू दशरथ पाटील, सुन संगिता महादू पाटील, नातू योगेश महादू पाटील आणि गणपत महादू पाटील यांच्या विरोधात पारेाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सुधीर चौधरी करीत आहे.