जळगाव लाईव्ह न्युज | ६ मे २०२२ | शेतकर्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे ही काळाची गरज आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये बोगस बियाणे आणि खतांचे प्रमाण वाढले असून याला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजीत खरीप पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री श्री पाटील यांनी शेतकर्यांनी कृषी खात्याच्या पंचसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले. यात प्रामुख्याने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया आणि किटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर करावा. ‘एक गाव – एक वाण’च्या अंतर्गत एकजीनसी व स्वच्छ कापूस उत्पादन अभियानात सहभागी व्हावे. रासायनिक खतांच्या संतुलीत वापरासाठी ठिबक सिंचनातून खत देणे, माती पृथ:करणावर आधारित खतांसह कृषक ऍपचा वाप करावा. आंतरपीक आणि मिश्रपीक पध्दतीवर भर द्यावा आणि आयसीएम म्हणजेच एकात्मीक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा. या पंचसूत्रीचा वापर केल्यास शेतकरी अधिक चांगल्या पध्दतीत पिके घेऊ शकतील असे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले. तर खते आणि किटकनाशकांच्या उपलब्धतेसाठी कृषी खात्याने प्रचारतंत्राचा योग्य तो वापर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेत.
या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी वैभव शिंदे, आमदार शिरीष चौधरी, चंद्रकांत पाटील, लाताताई सोनवणे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता चंद्रकांत दळवी, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता वाय. के. भदाणे, प्रकल्प उपसंचालक के. एल. तडवी, आत्मा समितीचे अध्यक्ष पी.के. पाटील, तेलबिया संशोधक डॉ. संजीव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी हेमंत बाहेती आणि महेश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सिंगर सुपर फॉस्फेट व एसएसपी यांच्या प्रचार व प्रसिध्दीचे तसेच इफकोच्या नॅनो तंत्रज्ञान प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. नंतर नियोजन भवनाच्या आवारातील कृषी प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनाची पालकमंत्र्यांसह मान्यवरांनी पाहणी केली. सभागृहात आढावा बैठक सुरू झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बॅनर, पोस्टर आणि घडी पत्रीकेचे विमोचन करण्यात आले. यात जिल्हा कृषी कार्यालयाचा अहवाल, कृषी विकास आधिकारी जळगाव यांनी तयार केलेली पत्रीका, कृषी विभाग व ममुराबाद कृषी विज्ञान केंद्र यांच्या घडीपत्रीका, कृषी विज्ञान केंद्र ममुराबादचे पोस्टर व घडीपत्रीका, कृषी विज्ञान केंद्र पाल आणि जिल्हा मृद चाचणी व सर्वेक्षण अधिकारी यांच्या पत्रीकांचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी विविध पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात आला. यात २०१७ सालच्या कृषी भूषण पुरस्काराने सन्मानीत उमरे ता. एरंडोल येथील समाधान दयाराम पाटील, २०१७ सालच्या उद्यान पंडीत पुरस्काराने सन्मानीत जामनेर येथील रवींद्र माधवराव महाजन व २०१८ सालच्या कृषीभूषण ( सेंद्रीय शेती) पुरस्काराने सन्मानीत करंज ता. जळगाव येथील अनिल जीवराम सपकाळे यांचा समावेश होता. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजनेच्या अंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या दिनेश मधुकर बोरसे ( चिंचखेड, ता. चाळीसगाव )- केळी प्रक्रिया; कामिनी योगेश साळुंखे ( कोळन्हावी, ता. यावल)- दुग्ध प्रक्रिया आणि पिंप्री खुर्द ता. धरणगाव येथील चंद्रकांत देवीदास चौधरी- पापड उद्योग यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या अंतर्गत जळके ता. जळगाव येथील श्रीमती अनिता ज्ञानेश्वर पाटील यांना दोन लक्ष रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच उल्लेखनीय कामगिरीसाठी कृषी खात्यातील अधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. यात चोपडा येथील कृषी सहायक दिनेश देवीदास पाटील; जामनेर येथील कृषी सहायक सचिन अशोक पाटील आणि कृषी उपसंचालक अनिल वसंतराव भोकरे या मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.