पदाधिकाऱ्यांचे आश्वासन, अधिकाऱ्यांचे आंदोलन मागे
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । महापौर, उपमहापौर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सोमवारपासून मनपा अधिकाऱ्यांकडून पुकारण्यात येणारे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय दि.२६ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
तत्कालीन नगरपालिकेत झालेल्या उड्डाण पदोन्नतीबाबत शासनाने मनपा अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याच्या विरोधात सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला होता. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी रविवार दि.२६ रोजी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा व विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा व विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना आम्ही तुमच्या पाठीशी असून कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही, यासंदर्भात एखादा धोरणात्मक निर्णय जरी घ्यावा लागला तर तो ही घेऊ, आम्ही शासनाकडे तुमचे प्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभाग समिती अधिकारी उदय पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आले.
यावेळी प्रभाग समिती अधिकारी उदय पाटील, राजेंद्र पाटील, एस.एस. पाटील, बाबा साळुंखे, शहर अभियंता अरविंद भोसले, बाळू भामरे, सुनील गोराणे, चंद्रकांत वांद्रे, लक्ष्मण सपकाळे यांसह शंभरावर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.