जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात सेवा मंडळ जवळ राहणारी एक महिला पंधरा वर्षानंतर देव दर्शनासाठी हरिद्वार येथे गेली होती. घरी कुणीच नसल्याने घर बंद होते. रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने संपूर्ण संसार बेचिराख झाला आहे. दरम्यान, महापौर जयश्री महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ तहसीलदार व तलाठी यांच्याशी संपर्क साधला आणि योग्य ती मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे त्यांनी सांगितले.
सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या सेवा मंडळ समोरील गल्ली दिलीप कन्हैयालाल पमनानी यांच्या घरात कशीश संजय वालेचा या एक मुलगा व मुलीसह राहतात. पतीपासून विभक्त असल्याने त्या परिसरातील काही कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. काही नातेवाईक हरिद्वार येथे जाणार असल्याने कशीश या देखील गुरुवारी हरिद्वार येथे गेल्या. तर दोन्ही मुले नंदेच्या घरी गेले होते.
रविवारी पहाटे ३.३० च्या सुमारास वालेचा यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. घर बंद असल्याने आग विझविण्यासाठी अडचणी आल्या. अग्निशमनदलाच्या दोन बंबाच्या मदतीने आग विझविण्यात आली. प्रसंगी चालक विक्रांत घोडेस्वार, वसंत दांडेकर, नंदकिशोर खडके, फायरमॅन भरत बारी, सोपान कोल्हे, नीलेश सुर्वे, भगवान जाधव यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, दुपारी ११ वाजेच्या सुमारास आगीने पुन्हा पेट घेतला असता अग्निशमन दलाच्या बंबाने पुन्हा धाव घेत आग आटोक्यात आणली.
आगीमध्ये वालेचा यांचा संपूर्ण संसार, संसारोपयोगी साहित्य बेचिराख झाले आहे. मुख्य हॉल, बेडरूम आगीच्या तावडीत सापडल्याने सर्व वस्तू, पैशांचा कोळसा झाला आहे. सुदैवाने आग किचनपर्यंत पोहचण्याअगोदर आटोक्यात आल्याने अनर्थ टळला आहे. महापौर जयश्री महाजन यांनी घटनास्थळी भेट देत नातेवाईकांशी चर्चा केली. महापौरांनी तात्काळ तहसीलदार आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधत संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. नुकसानग्रस्तांना योग्य ती भरपाई मिळण्यासाठी तातडीने पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करावी, असे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.