जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । भुसावळ शहरातून एक मोठी घटना समोर आलीय. ज्यात ५२ वर्षीय प्रौढाने स्वतःवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी (दि १२) घडली. डिगंबर बढे असं आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान आत्महत्यामागील कारण समजू शकले नसून मात्र प्रौढाकडे गावठी कट्टा आला कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

डिगंबर बढे हे भुसावळमधील एका खासगी ट्रॅव्हल कंपनीत कार्यरत होते. काही दिवसांपासून त्यांचा पत्नीशी वाद सुरू होता. या वादातून त्यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. दिंगबर यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. पत्नी माहेरी गेल्यामुळे आणि सततच्या वादाला कंटाळून दिगंबर यांनी टोकाचे पाऊस उचलले. त्यांनी घरामध्ये कुणी नसताना आपल्या खोलीमध्ये जाऊन गावठी कट्ट्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गोळी झाडल्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिगंबर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दिगंबर यांनी आत्महत्येसाठी वापरलेली बंदूक विनापरवाना असून त्यामध्ये एकच गोळी असल्याचे समोर आले. दिगंबर यांच्याकडे गावठी कट्टा आला कुठून? असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.