जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य उत्पादन शुल्क नियमावलीचे पालन न केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील १६ परमिट रूम बिअर बारवर प्रशासनाने टाळे लावले आहेत. वेळेत नूतनीकरण न झाल्यामुळे हे बार तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मद्यविक्रेत्यांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमावलीची पूर्तता करणे अनिवार्य असताना, नूतनीकरणाच्या प्रक्रियेत अडकलेल्या १६ परमिट रूम बिअर बारवर अखेर टाळे लागले आहे. विशेष म्हणजे, केवळ नूतनीकरणाअभावी बार बंद झाले असे नाही, तर जिल्ह्यातील एका व्यावसायिकाने आपला मद्यविक्रीचा व्यवसाय परवडत नसल्याने किंवा वैयक्तिक कारणास्तव स्वतःहून परवाना शासनाकडे सुपूर्द केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात एकूण मंजूर असलेल्या बारपैकी सध्या ५३५ बिअर बार पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. नूतनीकरण न झालेल्या १६ बारना नियमांची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय पुन्हा सुरू करता येणार नाही. मार्च महिना जवळ येत असल्याने परवाना शुल्काचा भरणा आणि नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इतर व्यावसायिकांचीही धावपळ सुरू आहे.








