जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. महिलांना सध्या १५०० रुपये दर महिन्याला दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींना २१०० दिले जाणार असल्याचं महायुतीच्या वाचनाम्यामध्ये म्हटलं होते. यामुळे आता लाडकी बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे.

यातच या २१०० रुपयांबाबत आदिती तटकरेंनी मोठ वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेबाबत यंदाच्या अर्थसंकल्पात निर्णय होईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, आदिती तटकरेंच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न काल विधानसभेत विचारण्यात आले. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी मिळणार यावर आदिती तटकरेंनी उत्तर दिले आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये या अर्थसंकल्पात दिले जाणार असल्याची घोषणा आम्ही कधीच केली नव्हती. जाहीरनामा हा ५ वर्षांसाठी असतो, असं आदिती तटकरे म्हणाल्या. ज्यामुळे आता लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी २१०० रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे.
आदिती तटकरेंच्या या वक्तव्यामुळे महिलांमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये यंदाच्या अर्थसंकल्पात मिळतील, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजनेतून ९ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये. या योजनेतून ५० लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.