जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या मुक्ताई यात्रोत्सवात दोनशेहुन अधिक दिंड्या दाखल झाल्या तसेच लाखो वारकऱ्यांनी मुक्ताईचे दर्शन घेतले. कोरोना लाटेदरम्यान तब्बल दोन वर्षे यात्रोत्सव झाला नव्हता. दोन वर्षानंतर मुक्ताई परीसरात भक्तीचा मळा फुलला. टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठुरायाच्या नामजपाने दोनशेच्या वर आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी नगर प्रदक्षिणा घालत मुक्ताईचा जयजयकार करत दर्शन घेतले.

जिल्ह्यासह बुलढाणा,अकोला व मध्य प्रदेशातुन वारकरी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ मुळ मंदिरात रविवारी पहाटे मंगलमय वातावरणात मुक्ताबाई संस्थान कोथळी चे मानकरी रविंद्र पाटील यांनी अभिषेक पुजा केली. खासदार रक्षा खडसे, अंकीता व संदिप पाटील यांनी महापुजा केली तर खामखेडा येथील माधुरी व अरुण सुभाष पाटील या दर्शनरांगेतील पहिल्या दापत्याला आरती व पुजेचा मान दिला. विनायकराव व्यवहारे यांनी पुरौहित्य केले. मंदा खडसे, सम्राट पाटील, उध्दव महाराज व भाविक उपस्थित होते.
नवीन मुक्ताबाई मंदिरात पंजाबराव पाटील यांनी सपत्निक अभिषेक केला. मंदिरात दोन क्विंटल द्राक्षांची आरास सजविण्यात आली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी श्रीक्षेत्र कोथळी व मुक्ताईनगर येथील दोंन्ही मंदिरांवर दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली होती. विविध सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबविले. यात्रोत्सवात विविध दुकाने लागलेली आहेत.