जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । जळगाव शहराच्या सुरुवातीलाच भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या आदिशक्ती ‘इच्छा देवी’ मातेचे मंदिर आहे. सुरुवातीला जळगाव शहराच्या बाहेर आणि तलावापासून जवळच असलेल्या चौकात देवीचे फार पुरातन मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार १९४७ मध्ये झाला असून भक्तांच्या इच्छा पूर्ण होत असल्यानेच देवीचे नाव इच्छा देवी पडले असल्याची आख्यायिका पडली आहे.
राष्ट्रीय महामार्गाला लागून श्री इच्छा देवीचं मंदिर आहे. इच्छा देवी ही नवसाला पावणारी असून भाविकांच्या अनेक भावना देखील या देवीशी जोडल्या आहेत. नवरात्रीच्या वेळेस मंदिरात भाविकांची गजबज पाहायला मिळते. नवसाला पावणारी इच्छा देवीचा भरपूर जुना व अलौकिक इतिहास असून. भाविकांच्या मनात इच्छा देवीचं स्थान सर्वप्रथम आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून नऊ दिवस देवीची विशेष पूजा-अर्चना व आराधना केली जाते अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव आनंदात साजरा केला जातो. इच्छापूर्ती करणाऱ्या इच्छा देवीचे मंदिर शहरापासून जवळच असलेल्या मेहरुन गावाच्या हद्दीतील शेत सर्वे नंबर 521 मध्ये आहे. (आता तिथे वस्ती आहे) जळगावचे रहिवासी भगीरथ गोवर्धन अग्रवाल यांच्या वडिलोपार्जित मालकीच्या असलेल्या शेताच्या दक्षिण बाजूस इच्छा देवीचे मंदिर आहे आता इच्छा देवी म्हणून ओळखले जाणारे मंदिर शेताच्या उताऱ्यावर भवानीचे मंदिर म्हणून संबोधलं गेलं होतं. भवानी मातेच्या लहानशा मंदिरात त्या काळात एक वृद्ध महिला देवीची मनोभावे पूजाअर्चा करत होती. इच्छा देवीचे मंदिर फार पुरातन काळाची असून या मंदिराचा जीर्णोद्धार 1947 साली अश्विन महिन्यात झाला होता. वर्षातून एकदा दसऱ्याच्या वेळेस अश्विन महिन्यात नवरात्र बसत असते या काळात सिंदूर वर्णी अशी एक देवीची मूर्ती असून शेजारी मूर्ती वास्तव्यास आहे हीच इच्छादेवी होय मूर्ती अतिशय सुंदर असून देवीची पूजाअर्चा दररोज नियमितपणे दोन वेळेस होत असते तिकडे भाविक देवीचे दर्शनास येत असतात.
जाणून घ्या मंदिराची आख्यायिका..
भगीरथ शेठ यांचे मूळ घराणे मारवाडी.. ते गोवर्धन जयनारायण यांचे दत्तक पुत्र होय.. त्यांचे वडील म्हणजे गोवर्धन हेही दत्तक होते.. अशीही दत्तक पुत्रांची वंशावळी चालू असताना भगीरथ शेठ यांना त्यांची पहिली पत्नी जेठाभाईपासून गोपीकिसन हा पुत्र (१९२३) झाला.. गोपीकिशन मोठा झाल्यावर त्याचं लग्न भगीरथ शेट यांनी नंदुरबार येथील दामोदर छोटेलाल अग्रवाल यांची सुकन्या गुलाबबाई यांच्याशी लावून दिले.. त्यानंतर अनेक दिवस उलटले तरी पण गोपीकिसनला संतान प्राप्ती होत नव्हती.. भगीरथ चिंतेत पडले, आधीच दत्तक पुत्रांची वंशावळी कोणाची दृष्ट लागली. भगीरथ शेट यांच्या घरातील स्त्रियांनी इच्छादेवीला नवस केला होता.. (त्यांचं वाक्य) हे माते गोपीकिसनला पुत्र प्राप्त होऊ दे तुझी यशाशक्ती पूजा करू.. गोपीकिशनला १७ एप्रिल १९६१ पुत्र प्राप्ति झाली.. पुत्र प्राप्ति झाल्यानंतर भगीरथ शेठ यांना उपरती झाली व दररोज देवीच्या पूजेची व्यवस्था त्यांनी केली..
श्री इच्छादेवी मंदिरात पोहचायचं कस?
श्री इच्छादेवीचे मंदिर जिथं आहे त्या चौकाला इच्छादेवी चौफुली म्हटलं जाते. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेलं हे मंदिर जळगाव शहराच्या मधोमधच आले आहे. शिरसोली, मोहाडीकडून शहरात येताना पहिल्याच चौकात मंदिर आहे. सिंधी कॉलनीपासून सरळ गेले कि इच्छादेवी चौफुली लागते, सोबतच आकाशवाणी चौफुलीपासून भुसावळ रस्त्याला जाताना देखील इच्छादेवीचे मंदिर लागतं असते. बस स्थानक, अजिंठा चौफुली, रेल्वे स्थानक, सुभाष चौकातून थेट रिक्षाने त्याठिकाणी पोहचता येईल.