जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२३ । शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , पोलीस अधीक्षक एम राजकुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी संयुक्तपणे भेट देऊन पाहणी केली. राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात विविध आवश्यक औषधी व वैद्यकिय साहित्याचा साठा महाविद्यालयात उपलब्ध असल्याचे रूग्णालय प्रशासनाने यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन व जिल्हा आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयातील औषधे व वैद्यकिय साहित्याची पाहणी करण्यात आली. महाविद्यालयाच्या विविध वॉर्डांना भेटी देऊन रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांनी विचारपूस केली. रुग्णांनी उपचाराबद्दल समाधान व्यक्त केले. भेटीदरम्यान कार्यरत वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
रुग्णालयाच्या आतील व परिसराच्या स्वच्छतेचीही पाहणी केली. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रुग्णालय प्रशासनाने स्वच्छता चांगली ठेवल्याचे दिसून आले. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील औषध साठा, स्वच्छतांबाबत जिल्हा प्रशासनाच्या तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील रुग्णांवर उत्तम दर्जाचे उपचार होत आहेत, त्यातही आरोग्य सुविधांमध्ये अजून काय वाढ करता येईल जेणेकरुन अधिकाधिक रुग्णांवर उत्तम दर्जाचे उपचार शक्य होतील. याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकुर, जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायकर यांनी उपलब्ध आरोग्य सोयी-सुविधांची माहिती दिली.
जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम दर्जाचे आरोग्य देण्यासाठी राज्य शासन कटिबध्द असून जिल्हा प्रशासन हे आरोग्य विभागासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.