कार्यकर्त्यांनो.. तुम्ही फक्त सतरंज्या उचला, नेत्यांना तुमच्या रोजगाराची चिंता नाही!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा तसा औद्योगिक प्रगतीच्या बाबतीत आजवर मागासलेलाच राहिला आहे. जळगावात दोन-तीन मोठे प्रकल्प सोडले तर दुसरे काहीच आले नाही. विशेष म्हणजे दळणवळणाची उत्तम सुविधा असताना देखील जळगावकर औद्योगिक प्रगतीपासून वंचित राहिले. नेते मंडळी पाठपुरावा केल्याचे पत्र दाखवीत असले तरी त्यामुळे फार काही पथ्यावर पडले नाही. उद्योग नसल्याने रोजगाराच्या बाबतीत तरुणांना देखील वाटा शोधाव्या लागल्या. नुकतेच महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर येत असल्याचे समोर येत असल्याने कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलायचे काम करावे लागणार असे दिसते.

राज्यात येणार असलेले ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याचे वृत्त समोर येत आहे. सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये ११८५ कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणाऱ्या या कंपनीने मात्र आता महाराष्ट्रातून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जागा मिळण्यास उशीर झाल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांच्या हाताला रोजगार मिळणार होता. अगोदरचे प्रकल्प गेल्याने हजारो कोटींची गुंतवणूक तर गेलीच शिवाय हजारो रोजगार आणि विकास देखील गेला.

राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जात असताना आपले नेतेमंडळी एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहेत. राज्यात मोठा प्रकल्प आणू असे आश्वासन सध्या मिळाले असले तरी आहे तोच प्रकल्प ठेवू असे मात्र कुणी बोलत नाही. प्रकल्प येणार हे आज आश्वासन असून भविष्यात कोणती कंपनी राज्यात गुंतवणूक करेल हे देखील अद्याप निश्चित नाही. जरी इतर कुठला प्रकल्प राज्यात आला तरी आज येणार असलेले उद्योग राज्याबाहेर गेल्याने जो रोजगार आणि आर्थिक विकास बुडाला आहे त्याची भर काही निघणार नाही. मुळात कुणी किती प्रकल्प आले यावर काथ्याकूट करत बसण्यापेक्षा आणखी किती प्रकल्प आणू शकतो यावर एकही पक्ष विचारमंथन करीत नाही. नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांची चिंताच पडलेली नाही.

जळगाव जिल्ह्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर जळगावातील मातब्बर नेते राज्याचे राजकारण बदलविण्याची ताकद ठेवतात परंतु ते देखील जिल्ह्यात मोठमोठे प्रकल्प आणण्याचे औदार्य दाखवीत नाही. आपल्याकडील नेते म्हणजे केवळ ‘बोलाचा भात आणि बोलाची कढी’ असे झाले आहे. सुप्रीम, रेमंड, पारले, बॉश, जैन याशिवाय स्पेक्ट्रम, स्पार्क, लीग्रँड, दाळ मील, चटई उद्योग सोडले तर इतर कोणतेही मोठे उद्योग आजवर जळगावात आलेले नाही. काही वर्षापूर्वी मोठमोठे २-३ प्रकल्प जळगावात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या परंतु त्या चर्चाच राहिल्या, प्रकल्प का आले नाही, कुणाचा पाठपुरावा कमी पडला हे समजलेच नाही.

जळगावात पुरेशा प्रमाणात प्रकल्प आणि रोजगार नसल्याने तरुणांना पुणे, मुंबई, नाशिक किंवा इतर ठिकाणी पळावे लागते. अनेकांनी तर कुटुंबासह इतर जिल्ह्यात स्थलांतर केले आहे. जळगावात विकास होत नाही त्यात रोजगार नाही त्यामुळे नाईलाजाने नागरिकांना इतर जिल्ह्यांचा पर्याय शोधावा लागत आहे. जळगावातील काही आमदारांनी आपल्या तालुक्यात उद्योग आणण्याचा प्रयत्न देखील केला त्यात ते काहीशे यशस्वी देखील झाले परंतु इतरांनी मात्र केवळ आश्वासनांचे गाजरच दाखवले. जळगाव जिल्ह्यात आजवर लोकसभेत भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे जिल्ह्यात दोन खासदार असताना देखील ये अयशस्वी ठरले. आपल्याकडील राजकारण्यांना एकमेकांवर टीका करण्यात मोठी धन्यता वाटते मात्र विकासाचे नाव आले कि काहीतरी गोलमटोल उत्तर दिले जाते.

दळणवळणाच्या दृष्टीने विचार केल्यास जळगाव हे उत्तम ठिकाण आहे. महामार्ग आणि रेल्वे सुविधा उपलब्ध असल्याने जळगावात प्रकल्प आणणे सहज शक्य होते मात्र आपल्या पुढाऱ्यांनी ते काही आणलेच नाही. जळगावच्या शेजारील जिल्हा संभाजीनगर औद्योगिकदृष्ट्या संपन्न झाला मात्र जळगाव तसेच राहिले. आपल्यासोबत सावलीसारखे उभे राहणारे कार्यकर्ते, आपल्याला भरभरून मतदान करणारे तरुण मतदार यांचा विचार नेत्यांनी केला असता तर नक्कीच काही प्रकल्प जळगाव जिल्ह्यात आले असते. रोजगार नसल्याने अनेक तरुण वाळूच्या व्यवसायात आणि गुन्हेगारी व अवैध धंद्यांकडे वळले आहेत. पैशांच्या व्यवहारातून खून होऊ लागले आहेत. पुरेसा रोजगार उपलब्ध असता तर या समस्या निर्माणच झाल्या नसत्या. जळगाव जिल्ह्यात उद्योग प्रकल्प कधी येणार हे निश्चित नसले तरी कार्यकर्ते सतरंज्याच उचलणार हे मात्र आज दिसून येते.