जळगाव जिल्हा

विनातिकीट आढळल्यास प्रवाशासह वाहकावर होणार कारवाई?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । शासनाने लॉकडाऊन उठविल्यानंतर महाराष्ट्र परिवहन महामंडळातर्फे पूर्ण क्षमतेने बससेवा सुरु करण्यात आली आहे. बससेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांची देखील बसमध्ये गर्दी होत आहे. या गर्दीचा गैरफायदा काही प्रवाशांकडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे परिवहन प्रशासनातर्फे २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तपासणी दरम्यान, विनातिकीट प्रवाशी आढळल्यास प्रवाशासह वाहकावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बससेवा बंद ठेवण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून शासनाने लॉकडाऊन उठविले आहे. त्यामुळे अनलॉकनंतर एसटी महामंडळाने राज्यासह परराज्यात पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू केली आहे. प्रवाशांचादेखील त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, एसटी महामंडळ प्रशासनाने गैर प्रकारांना आळा बसावा, यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत प्रवाशांची तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत महामंडळाच्या जळगाव विभागातून बाहेरगावी जाणाऱ्या-येणाऱ्या बसेसला रस्त्यात कुठेही थांबवून प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात येणार आहे.

१४ पथकांची नियुक्ती
महामंडळातर्फे तिकीट तपासणीसाठी १४ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात महामंडळाच्या विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून शहरासह ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसमधील प्रवाशांचीही तिकीट तपासणी या पथकांकडून करण्यात येणार आहे. बुधवारपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

वाहकावरही होणार कारवाई
तिकीट तपासणी दरम्यान, बसमध्ये विनातिकीट प्रवासी आढळल्यास, त्या प्रवाशावर दंडात्मक कारवाई होणार आहे. या सोबतच बसमधील वाहकावर देखील कारवाई होणार आहे. यात दोषी आढळल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई किंवा इतर आगारात बदलीची कारवाई केली जाणार असल्याचे समजते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button