⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पोलिसांच्या हातावर तुरी देत पळालेला आरोपी २४ तासात पुन्हा गजाआड

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । भुसावळ शहर पोलिसात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी राजू विक्रम कांडेलकर याला बुधवारी पोलीस कर्मचारी धुळे कारागृहात घेऊन जात होते. जैन पाईपजवळ पोलीस वाहनातून उडी घेत त्याने धूम ठोकली होती. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने अवघ्या २४ तासात त्याचा शोध घेत त्याला पुन्हा जेरबंद केले आहे.

भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या राजू विक्रम कांडेलकर वय-२०, महालखेडा, ता.मुक्ताईनगर यास धुळे सबजेल येथून घेऊन शासकीय वाहनाने भुसावळ येथे घेऊन जात होते. जैन पाईप फॅक्टरी पाळधी येथे वाहन हळू होताच त्याने वाहनातून उडी घेत धूम ठोकली होती. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी आरोपीच्या अटकेसाठी सूचना केल्या होत्या.

एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त माहिती मिळाली कि राजू कांडेलकर हा रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे भावाच्या घरी आहे. एलसीबीच्या पथकातील सहाय्यक फौजदार वसंत लिंगायत, दीपक पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अशोक पाटील, यांचे पथक तपासासाठी पाठविले होते. पथकाने तांदलवाडी येथे जाऊन त्याचा शोध घेतला असता तो त्याचा भाऊ राहुल कांडेलकर याच्या घरात लपलेला होता. पथकाने राजू कांडेलकर याला सापळा रचून अटक केली आहे.