जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । मी शेतातील विहिरीवर बसलो होतो. तेव्हा दोन्ही पोरं विहिरीत दगड टाकत होते. मी त्यांना हटकले तेव्हा त्यांनी मला दगड मारला त्यामुळे संतापात मी दोघांना विहिरीत टाकले, अशी कबुली चुंचाळे येथील दोघी भावंडांच्या खूनप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या नीलेश सावळे याने पोलिसांना दिली आहे. दोघी भावंडे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे मृतदेह गुरुवार दि.२८ रोजी त्यांच्याच शेतातील विहरीत आढळून आले होते.
चुंचाळे (ता. यावल) येथील रितेश (वय-४) आणि हितेश (वय-३) ही दोन्ही भावंडे बुधवार दि.२७ रोजी वडील रवींद्र मधुकर सावळे (वय-३५) आणि आई उज्ज्वला सावळे यांच्यासोबत चुंचाळे शिवारातील गट नं. ३६५/१ मधील शेतात गेली होती. यादरम्यान दोन्ही मुले बेपत्ता झाले होते. त्यानंतर गुरुवार दि.२८ रोजी या दोन्ही भावंडांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहरीत आढळून आले होते. याप्रकरणी या मुलांचा चुलत काका नीलेश सावळे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
सापत्न वागणुकीचा होता डोक्यात राग
वडिलोपार्जीत शेतीचे उत्पन्न दाखवले जात नाही, नोकरासारखी वागणूक मिळते, बुधवारी सर्वजण जेवायला बसलो तेव्हा मला एकच पोळी दिली, इतर सर्व पोटभर जेवले. परत दुपारी दोघा पोरांना जेऊ घातले मला विचारले देखील नाही, याचा राग मनात होता. बुधवारी मी शेतातील विहिरीवर बसलो होतो. तेव्हा दोन्ही पोरं विहिरीत दगड टाकत होते. मी त्यांना हटकले तेव्हा त्यांनी मला दगड मारला, त्यामुळे संतापात मी दोघांना विहिरीत टाकले. अशी कबुली संशयित नीलेश सावळे (वय-३२) याने पोलिसांना दिली. दरम्यान, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुंचाळे येथे अंत्यसंस्कार
संशयिताने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी पट्टीच्या पोहणार्यांच्या माध्यमातून विहिरीत शोध घेतल्यानंतर दोन्ही बालकांचे मृतदेह गुरुवार दि.२८ रोजी दुपारी काढण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर रात्री दोन्ही बालकांवर चुंचाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या माता-पित्यांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.