जळगाव एमआयडीसीतील एका कंपनीत रोख ३० हजार रुपयांच्या चोरीची घटना घडली असता यात संशयित आरोपीस मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. अरविंद अरुण वाघोदे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, जळगाव एमआयडीसी व्ही सेक्टर परिसरातील महेश प्लास्टिक इंडस्ट्रीज या कंपनीत १३ मे रोजी चोरी झाली होती. त्यात रोख रकमेसह एकुण तिस हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल चोरीस गेला होता.
सदर चोरीचा प्रकार 15 मे रोजी उघडकीस आल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक तुषार राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सफौ अतुल वंजारी, पोलीस नाईक इम्रान सय्यद, पोका. गोविंदा पाटील, सुधीर साळवे आदी करत होते. तपासादरम्यान घटनास्थळी चपलेचे ठसे मिळून आले होते. चपलेच्या ठशांसह इतर माहितीच्या आधारे तपासाला गती देण्यात आली होती.
सदर चोरीचा प्रकार सुप्रिम कॉलनी परिसरातील अरविंद अरुण वाघोदे याने केला असल्याची गोपनीय माहीती तपास पथकातील कर्मचारी इमरान सैय्यद यांना समजली. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक इमरान सैय्यद, पो.कॉ. गोविंदा पाटील, सुधीर साळवे आदींनी अरविंद अरुण वाघोदे याला मुद्देमालासह शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात यश मिळवले. ताब्यातील व अटकेतील अरविंद वाघोदे याच्यावर यापुर्वी देखील विस लाख रुपये चोरीचा गुन्हा दाखल आहे.