गुरूवार, जून 8, 2023

Yawal : 20 हजारांची लाच घेताना लेखापाल एसीबीच्या जाळ्यात अडकला..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरी बोकाळली असून दिवसेंदिवस लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे सातत्याने कारवाई होत असताना देखील सरकारी कर्मचारी वा अधिकारी वर्ग लाच घेण्यापासून हात आखडता घेत नसल्याचे चित्र आहे.

अशातच आता यावल मधून लाचखोरीची एक बातमी समोर आलीय. यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापाला भोजन ठेकेदाराकडून 20 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. रवींद्र बी.जोशी असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे.

नेमका काय आहे प्रकार?

जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी वस्तीगृहाला तक्रारदाराची पत्नी चालवत असलेल्या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून 2021-22 वर्षात भोजन पुरवठा करण्यात आला होता. त्यापोटी 73 लाखांचे बिल मंजूर होवून मिळाले देखील मात्र काम करून देण्याच्या मोबदल्यात मंजूर बिलाच्या अर्धा टक्के अर्थात 36 हजार 500 रुपयांची लाच मागण्यात आली.

मात्र तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरलं. याबाबतची तक्रारदार यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापाला रचून रवींद्र बी.जोशी याला आदिवासी कार्यालयातच लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.