⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

भयंकर! खड्डयांमुळे स्कुटी घसरल्याने ती खाली पडली, तितक्यात मागून कंटेनर आला अन्..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२३ । राज्यातील अनेक भागातल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झालीय. खराब रस्त्यांमुळे अपघात होत असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. यातच एक दुर्दैवी घटना समोर आलीय. खड्डयांमुळे स्कूटी घसरून पडल्याने यावरील तरूणीला मागील येणाऱ्या कंटेनरने चिरडल्याची घटना शहादा तालुक्यातील अनरद बारी जवळ घडलीय. हर्षदा रवींद्र ठाकरे (पाटील) असं मृत तरुणीचे नाव असून कुटुंबातील एकुलत्या एक कन्येचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी काय आहे घटना?
अमळनेर तालुक्यातील,वावडे येथील रवींद्र साहेबराव पाटील यांची एकुलती एक मुलगी हर्षदा ही आपल्या कुटुंबासमवेत तोरणमाळ येथून घरी परत येत होती. शहादा तालुक्यातील अनरद बारी जवळ रस्त्यावर असलेल्या खड्डयामुळे स्कूटी क्रमांक(एमएच १८ बीडब्ल्यू ०२७४) हीच्यावरून तिचा तोल गेल्याने ती खाली पडली. खाली पडताच मागून येणार्‍या एमएच३४ बीजी ५८८५ या कंटेनरने तिला जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पाटील कुटुंबाच्या समोरच त्यांच्या कन्येचा मृत्यू झाल्याने त्यांनी अपघातस्थळी प्रचंड आक्रोश केला.

मयत हर्षदा ही शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी विद्यालयाला दुसर्‍या वर्षाला शिकत होती. ती शाळेत देखील अत्यंत हुशार व प्रेमळ मनमिळावू स्वभावाची होती.तिच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली आहे.हर्षदा ही सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील आहे.अपघाताचे वृत्त कळताच वावडे गावात शोककळा पसरली आहे. खराब रस्त्यावरील खड्डयाने या तरूणीचा बळी घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.