⁠ 
रविवार, मे 19, 2024

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण दुर्घटना : १७ जणांचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२३ । विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील (Samriddhi Highway) अपघातांचे सत्र थांबता थांबत नसून अशातच एक मोठी दुर्घटना घडलीय. महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर मशीनसह क्रेन कोसळून २० ते २५ कामगार दबले गेले. यातील १७ कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान ही घटना ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे पुलावर सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू आहे.

या ठिकाणी कामगार आणि इंजिनिअर काम करत होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला. तर पाच ते सहा कामगार जखमी असल्याची माहिती आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून आता या क्रेन व ग्रेडर खाली किती जण दाबले गेले आहेत, हे संपूर्ण ग्रेडर बाजूला केल्यावर समजले. गेल्या महिनाभरात समृद्धी महामार्गावरील अपघाताची ही दुसरी मोठी घटना असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर घटनेतील जखमींना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असंही ते म्हणाले.